बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामाला मुंबई महापालिकेने एमआरटीपी अंतर्गत (महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लानिंग) नोटीस बजावण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या वास्तू विशारदाने इमारत आणि  प्रस्ताव खात्याकडे सादर केलेले सुधारित आराखडे नामंजूर झाल्याची माहिती आरटीआय अंतर्गत समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयाकडे अमिताभ बच्चन आणि इतर काही सेलिब्रिटी यांना एमआरटीपी अंतर्गत जारी केलेल्या नोटीसचे काय झाले? याबाबत माहिती विचारली होती. मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयाने अमिताभ बच्चन, राजकुमार हिरानी, पंकल बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी आणि ओबेरॉय रिअॅलिटी या सगळ्यांना मंजूर आराखड्यानुसार आढळलेल्या अनियमितता पूर्ववत करण्यासाठी ७ डिसेंबर २०१६ रोजी ही नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेने एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावल्यानंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी एक प्रस्ताव सादर केला. मात्र १७ मार्च २०१७ रोजी इमारत आणि प्रस्ताव खात्याने तो प्रस्ताव नामंजूर केला. एवढेच नाही तर इमारत आणि प्रस्ताव खात्याने ११ एप्रिल २०१७ रोजी पी दक्षिण कार्यालयास रितसर माहिती दिली. ज्यानंतर या कार्यालयाने ६ मे २०१७ रोजी अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडण्याचीही ताकीद दिली.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शशांक कोकीळ यांनी दुसऱ्यांदा प्रस्ताव सादर केला. मात्र हा प्रस्तावही नामंजूर करण्यात आला. १२ सप्टेंबर २०१७ रोजी पी दक्षिण कार्यालयाने इमारत आणि प्रस्ताव खात्याशी पत्रव्यवहार केला. बांधकाम नियमित करण्यात आल्याबाबत काय स्पष्टीकरण आहे? ते कळवावे अशी विचारणा या पत्रात करण्यात आली.

दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणीही केली. इमारत खात्यातील काही अधिकारी अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत. वारंवार वास्तुविशारदाचा प्रस्ताव नामंजूर होऊनही पुन्हा संधी दिली जाते आहे असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. इतकेच नाही तर हे अधिकारी कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.