गोरेगाव (पश्चिम) येथील प्रस्तावित ओशिवरा रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येणार आहे. या पुलाच्या नामकरणावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली होती. मात्र शिवसेनेची सरशी झाली आणि या पुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यात आले.
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ५ वाजता राम मंदिर मार्ग, मुव्ही स्टार सिनेमासमोर, गोरेगाव (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) योजनेअंतर्गत २००४ मध्ये हा पूल प्रस्तावित करण्यात आला होता. हा प्रकल्प २००८ मध्ये पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. निवासी २१८, व्यावसायिक १४० अशी एकूण ३५८ अतिक्रमणे या प्रकल्पाआड येत होती. काही अतिक्रमणे हटवून व काहींचे पुनस्र्थापन करुन हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला.