‘अनुष्टुभ’ या नियतकालिक-चळीवळीद्वारे १९८० नंतरच्या मराठी साहित्यचिंतनाला आकार देणारे ज्येष्ठ समीक्षक म.सु.पाटील यांचे शुक्रवारी रात्री मुलुंड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईकांसह मनमाड आणि मालेगावचे विद्यार्थी म.सु. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एकत्र आले होते. शनिवारी सकाळी मुलुंडमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातून म.सु. यांची समीक्षा दृष्टी आणि साहित्यविचार व्यक्त झाला. त्यास अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या समीक्षा विचारात कार्ल युंगच्या मानवी मनाच्या संकल्पनेचा प्रभाव होता. युंगचा आदिबंधाचा सिद्धांत मराठीत त्यांनी रुजवला. म. सु.  पाटील हे मनमाडच्या महाविद्यालयात सुरुवातीला प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य अशी जवळपास दोन दशके कार्यरत होते. संयत आणि स्थितप्रज्ञ साहित्यचिंतक अशी म.सु. पाटील यांची ओळख अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘लांबा उगवे आगरी..’ या त्यांच्या आत्मकथनातूनही ठळक झाली आहे.

बदलत्या कविसंवेदनाचा वेध.. : भिन्न भिन्न काळातील, भिन्न प्रवृत्तींच्या कवींच्या काव्याचे साक्षेपी समीक्षक अशी म.सु. यांची ओळख. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘दलित कविता’ या पुस्तकांनतर ‘अक्षरवाटा’, ‘आदिबंधात्मक समीक्षा’, ‘भारतीयांचा साहित्यविचार’, ‘कवितेचा रूपशोध’, ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’, ‘ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध’, ‘तुकाराम : अंतर्बाह्य संघर्षांची अनुभवरूपे’, ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’ ही त्यांची समीक्षापर पुस्तके प्रसिद्ध झाली. बालकवी, सदानंद रेगे, इंदिरा संत यांच्या काव्यावर विस्ताराने लिहिणाऱ्या म.सु. यांनी  बदलत्या कविसंवेदनांचाही वेध घेतला.

तपस्वी समीक्षक हरपला..

पाटील यांच्या निधनामुळे आदर्श आणि तपस्वी समीक्षक हरपल्याची खंत साहित्य वर्तुळातून होत होती. पाठय़ुस्तकापलीकडचे अध्यापन हे त्यांचे एक वैशिष्ट होते, अशी प्रतिक्रिया समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांनी दिली. तर कवितेचे सुंदर पर्व संपले, असे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले. मध्ययुगीन कवितेपासून ते आजच्या कवितेपर्यत काव्य समीक्षण त्यांनी केल्याची माहिती ज्येष्ठ समीक्षक वसंत पाटणकर यांनी दिली. मराठी साहित्य क्षेत्रात कवी आणि लेखकांच्या जवळपास चार पिढय़ा त्यांनी घडविल्या. अगदी कालपरवापर्यंत वाचलेल्या पुस्तकांबाबत चर्चा करणे, त्यांची मते जाणून घेणे यासाठी अनेक साहित्यिक त्यांच्याकडे जात असत. त्यामुळे जणू ते एक संस्थाच बनले होते, असे समीक्षक नितीन रिढे यांनी नमूद केले. ‘अनुष्टुभ’चे संपादक म्हणून त्यांनी समीक्षणात्मक लिहिणाऱ्यांची पिढी घडविली, असे समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी सांगितले. तर कवितेच्या अभिजाततेसाठी सतत कार्यशील असणारे ते शेवटचे समीक्षक होते, असे ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल म्हणाले.