राधेश्याम मोपलवार ( व्यवस्थापकीय संचालक राज्य रस्ते विकास महामंडळ)

समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्य़ांतून जात असून तो नागपूरला मुंबईपर्यंत तर जोडेलच, पण त्यामुळे हे सर्व जिल्हे आणि अन्य १४ जिल्हे जेएनपीटीसारख्या देशातल्या एका सर्वात मोठय़ा मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होणार आहे.

जगातील अमेरिका, युरोप या देशांमधील विकास झपाटय़ाने झाला. पूर्वेकडे पाहिले असता आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेले, आपल्या देशासारखीच सामाजिक, आर्थिक परिस्थिती असलेले इतर देश हे पुढे आहेत. जपान दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाले होते. मात्र पुन्हा नेटाने उभे राहून त्यांनी १९५५ साली द्रुतगती महामार्ग बांधण्यास सुरुवात केली. १० हजार किलोमीटरहून जास्त अंतराचे द्रुतगती महामार्ग त्यांच्याकडे आहेत. भारतापेक्षा काही वर्षांपूर्वी अविकसित असलेला दक्षिण कोरिया हा देश विदर्भाइतक्या आकाराचा असून १९६८ मध्ये ५ हजार ५०० किलोमीटर लांबीचे द्रुतगती महामार्ग या देशात बांधून तयार झाले. मात्र या देशांच्या तुलनेत आपल्याकडे झालेला रस्त्यांचा विकास हा फार उशिराने झाला असेच म्हणावे लागेल.

मुंबई-नागपूर समृद्धी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग हा गेल्या चार वर्षांपासून चर्चेत आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३ लाख ७ हजार चौ.किमी. आहे. शहरासह ग्रामीण भागाचा समावेश असणारा असा विस्तीर्ण महाराष्ट्र विविध दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आर्थिक विकास आणि लोकसंख्येतही तितकाच महत्त्वाचा वाटा असणाऱ्या या महाराष्ट्रातील जेएनपीटी येथून देशांतर्गत होणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाणही अधिक आहे. या सर्वामध्ये महामार्गाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. ९४.६ किलोमीटरचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा १९९८ ते २००२ या कालावधीत बांधून कार्यान्वित झाला. हा महामार्ग विकसनशील महाराष्ट्राचे उत्तम उदाहरण आहे. या महामार्गामुळे उद्यमशीलतेवर झालेला चांगला परिणाम लक्षात येतो. ज्याप्रमाणे मुंबई-पुणे महामार्ग हा महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाचा ठरला, त्याप्रमाणेच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हाही महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ मुंबई आणि पुणे जोडून उपयोग नाही, तर संपूर्ण राज्यात विविध जिल्हे एकमेकांशी जोडायचे आसल्यास मुंबई-नागपूर महामार्ग होणे आवश्यक आहे आणि याच संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाची घोषणा २१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत केली.

हा द्रुतगती महामार्ग ७०० कि.मी. लांबीचा असेल आणि १० जिल्ह्य़ांतील २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना थेट जोडेल. नागपूर ते भिवंडीपर्यंत आणि भिवंडीपासून ते ठाण्याच्या रेमंड जंक्शनपर्यंतचा २४ किलोमीटरच्या ८ मार्गिकांच्या रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे आपण ठाण्याच्या मुलुंड नाक्यावरून निघाल्यानंतर २०२१ला नागपूरच्या जामठा स्टेडियमला पोहचण्यासाठी साधारणत: सहा ते साडेसहा तासांचा अवधी लागेल असे या महामार्गाचे नियोजन आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्य़ांतून जात असून तो नागपूरला मुंबईपर्यंत तर जोडेलच, पण त्यामुळे हे सर्व जिल्हे आणि अन्य १४ जिल्हे जेएनपीटीसारख्या देशातल्या एका सर्वात मोठय़ा मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होणार आहे. आजमितीला मुंबई आणि नागपूर प्रवासासाठी कार आणि बसला १८ ते २० तास लागतात. तसेच मालवाहतुकीचा विचार केला तर नागपूरहून जेएनपीटीला पोहचायला जड-अवजड वाहनांना ३६ ते ४८ तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई यांमधला प्रवास केवळ ८ तासांचा होईल. यामुळे नागपूर ते औरंगाबाद हे अंतर ४ तासांत, तर औरंगाबाद ते मुंबई हे अंतर फक्त ४ तासांमध्ये पार होऊ  शकेल. या महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट आणि मुंबईचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणे एकमेकांना जोडली जातील.

महामार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम झाले असून पुढील काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्ग प्रकल्पात जमीन दिल्यामुळे जमीनमालकांचे जे काही नुकसान होणार आहे त्यासाठी भरपाई म्हणून त्यांना १० वर्षांसाठी आर्थिक मदतदेखील दिली जाणार आहे. ज्या भागातून महामार्ग जाणार आहे त्या भागातील एक हजार ते दोन हजार हेक्टर जमिनीवर कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगार निमिर्ती होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे सहा नव्या मोठय़ा औद्योगिक वसाहतींची उभारणी होणार आहे. या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग असणार आहेत. मुंबई-नागपूर हा महाराष्ट्राचा समृद्धी महामार्ग माहाराष्ट्राचे वैभव वाढवणारा ठरेल.

शब्दांकन : ऋषिकेश मुळे