News Flash

आंदोलनाची झळ बसलेल्या बस घेऊन एसटीची जनजागृती?

संप, आंदोलने झाली की एसटी बस गाडय़ांवर दगडफेक, जाळपोळ करून त्यांचे नुकसान केले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यात आंदोलने झाली की पहिला दगड हा एसटीवरच पडतो. आंदोलनात एसटी गाडय़ांची जाळपोळही केली जाते. यात एसटी महामंडळाचे नुकसान होतेच, शिवाय प्रवाशांनाही बसचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे तोडफोड झालेल्या किंवा जाळपोळ झालेल्या बस घेऊन राज्यभर जनजागृती मोहीम चालविण्याचा विचार महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून केला जात आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

संप, आंदोलने झाली की एसटी बस गाडय़ांवर दगडफेक, जाळपोळ करून त्यांचे नुकसान केले जाते. नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनात तर जवळपास ५०० पर्यंत एसटी बस गाडय़ांची तोडफोड करतानाच त्यातील काही बस गाडय़ा जाळण्यातही आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत झालेल्या आंदोलनात एसटी महामंडळाला ही बसलेली सर्वात मोठी झळ आहे. त्याआधी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ८ व ९ जून रोजी केलेल्या अघोषित संपातही काही बसचे नुकसान करण्यात आले.  या आंदोलनानंतर एसटी बस गाडय़ांचे नुकसान करू नका, असे आवाहनही करणारे पत्रक महामंडळाकडून सर्व आगार व स्थानकात वाटप करण्यात आले. आतापर्यंत एक लाखाहून अधिक पत्रके वाटण्यात आली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनात एसटीला बसणारी झळ पाहता महामंडळ आता वेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचा विचार करत आहे.

आंदोलनात जळालेल्या दोन किंवा एक बस आणि एक चांगली बस सोबत घेऊन राज्यभर जनजागृती करण्याचा विचार आहे. या बस घेऊन आंदोलनात एसटीला टार्गेट करू नका, ती होरपळू नये अशा प्रकारे संदेश बसवर नमूद करून आवाहन केले जाईल. मराठा आंदोलनात पुणे, मराठवाडा यासह काही भागांत एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत झालेल्या अन्य आंदोलनांतही याच भागांत मोठी झळ एसटीला बसत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रथम याच भागांत झळ पोहोचलेल्या बस गाडय़ा फिरवून जनजागृती करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हळूहळू राज्यातील उर्वरित भागांतही या बसमार्फत जनजागृती केली जाईल. यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

’ झळ पोहोचलेल्या एक किंवा दोन बस राज्यभर जनजागृती करण्यासाठी शासनाचीही विशेष परवानगी लागेल. बसवर जनजागृतीचे संदेश लिहिण्यासाठी त्यांच्या रंगसंगतीवरही काम केले जाईल.

’ साधारणपणे ऑक्टोबर किंवा त्याआधीपासून ही मोहीम सुरू करण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 2:28 am

Web Title: msrtc awareness campaign by running burn buses on road
Next Stories
1 पुनरागमन करताना राज्यात पावसाचा तडाखा
2 मेनका गांधींपाठोपाठ वरुण गांधीही प्रेमासाईंच्या दर्शनासाठी यवतमाळात
3 राज्यातील शैक्षणिक उणिवांवर केंद्राचे बोट!
Just Now!
X