वेतनवाढ, तोटय़ाकडे दुर्लक्ष करीत दिखाऊपणावर नऊपट अधिक खर्च

गेल्या १७ महिन्यांपासून कामगारांची रखडलेली वेतनवाढ, एसटीचा वाढत जाणारा तोटा अशी आर्थिक परिस्थिती असताना एसटी महामंडळाने ‘आऊटसोर्सिग’द्वारे स्वच्छतेवर आत्ता केला जात आहे त्याहून तब्बल नऊपट म्हणजे ४४६ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे.

मूलभूत गोष्टींची पूर्तता न करता स्वच्छतेवरील खर्चात होणारी ही नऊपटींची वाढ शंकास्पद आहे. एसटीचा आर्थिक डोलारा गेल्या काही वर्षांपासून कोसळतो आहे. महामंडळाचा गेल्या वर्षीचा संचित तोटा १,८०० कोटी रुपयांपर्यंत होता. हाच तोटा वाढून आता २,३०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवताना एसटीच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेने सातव्या वेतन आयोगासह अन्य काही आर्थिक स्वरूपाच्या मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य केल्यास महामंडळावर हजारो कोटींचा बोजा पडू शकतो.

अशी आर्थिक परिस्थिती असतानाही एसटी महामंडळाकडून स्थानकांची, बसगाडय़ांची आणि कार्यालयांची स्वच्छता करण्यासाठी ४४६ कोटी ९९ लाख ८१ हजार ८७२ रुपये खासगी कंपनीला मोजले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  महामंडळाकडून या कामाकरिता निविदाही काढल्या जाणार असल्याचे समजते.

झाले काय?

या संदर्भातील प्रस्ताव नुकताच महामंडळाकडून मंजूर करण्यात आला. हा तीन वर्षांचा करार असेल. याआधीही महामंडळाकडू्न स्वच्छतेचे काम खासगी कंपनीकडून करवून घेण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो ८१३ कोटी रुपयांचा होता. मात्र तो अव्यवहार्य आणि अवाजवी असल्याचे स्पष्ट करीत तो रद्द करण्यात आला. त्यानंतर महामंडळाने ४४६ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव तयार केला.

नऊ पटींची वाढ

महामंडळाकडूनच बस स्थानके, बस आणि कार्यालयाची स्वच्छता करताना दर वर्षी ५० कोटी रुपये खर्च केला जातो. मात्र या कामामध्ये गुणवत्तेचा अभाव असल्याचे कारण पुढे करीत महामंडळाने स्वच्छतेसाठी नऊपट खर्च करून बाहेरच्या कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी दूरध्वनीवर वारंवार संपर्क  साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

महामंडळाकडे उपलब्ध पदे

  • स्वच्छक पदे – १,२९३
  • सफाईगार पदे – ५१४
  • एकूण पदे – १,८०७