मराठवाडय़ासह राज्याच्या इतर भागांत पडलेल्या दुष्काळामुळे राज्याचा आर्थिक डोलारा दोलायमान झाला असताना या दुष्काळाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. आधीच तब्बल हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सोसणाऱ्या एसटी महामंडळाचे कंबरडे या दुष्काळामुळे मोडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६२ टक्क्यांच्या आसपास असलेले एसटीचे प्रवासी भारमान गेल्या तीन महिन्यांत ५८ टक्के इतके खालावले असून प्रामुख्याने दुष्काळामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे एसटीतील सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे मुंबई-ठाणे परिसरातून मराठवाडय़ात जाणाऱ्या १८ गाडय़ा अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत.
एकीकडे एसटी महामंडळ आपला चेहरा बदलण्यासाठी ‘शिवनेरी’ वर्गातील ५०० नवीन गाडय़ा भाडय़ाने घेण्याचा विचार करत आहे. या गाडय़ा राज्यभरातील विविध मार्गावर चालवण्याचा विचार असताना, दुसऱ्या बाजूला एसटीचे प्रवासी भारमान कमालीचे खालावले आहे. त्यातच मराठवाडय़ात पडलेल्या दुष्काळामुळे या भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे मराठवाडा विभागातील अनेक सेवा बंद करण्याची वेळ एसटीवर आली आहे. यात मराठवाडय़ातील मोठय़ा शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या काही सेवांचाही समावेश आहे.
दुसऱ्या बाजूला मुंबई-ठाणे परिसरातून बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी, औरंगाबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या १८ गाडय़ा बंद करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. दुष्काळाचे सावट दूर झाले आणि तेथील जनजीवन सुरळीत झाले की, या गाडय़ा पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

’ दीड वर्षांपूर्वी ६० टक्क्यांच्या आसपास असलेले प्रवासी भारमान गेल्या वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढून ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.
’ दुष्काळामुळे हे प्रवासी भारमान ५८ टक्क्यांवर आले.
जालना, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन विभागांत प्रवासी संख्येत सर्वाधिक घसरण.