मुंबई : ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता शाळा ते गाव यादरम्यान त्यांना एसटीची मोफत सेवा देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटी महामंडळाला १९७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. वर्ष २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीकरिता एकूण ४२८ कोटी ८८ लाख रुपये देण्यात येणार असून त्यातील ही रक्कम देण्यात आली आहे.

महिला व बाल कल्याण विभागातर्फे एसटीला मानव संसाधनाअंतर्गत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता विशेष बसेस पुरविण्यात येतात. सध्या मानवी संसाधनाअंतर्गत ८७२ बस एसटीच्या ताफ्यात आहेत. वाहतुकीवरील खर्चामुळे किंवा वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमांतर्गत निधी दिला जात आहे.

सध्या एसटीतर्फे राज्यात अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ५वी ते १२वी आणि मानव निर्देशांकाअंतर्गत ८ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जातो.