दिवाळीच्या काळात एसटीने १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात प्रवाशांचा एसटी बसना चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटी बसचे भाडे नेहमीपेक्षा अधिक असणार आहे.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ राहणार आहे.

एसटीची ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बसेसला लागू राहणार आहे. ही भाडेवाढ शिवशाही (शयनयान), शिवनेरी व अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिवाळीच्या जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळातर्फे २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे ३५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या जादा वाहतुकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.