आरामदायी प्रवासासोबत मनोरंजनाची चोख काळजी घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी युरोपात लोकप्रिय ठरत असलेल्या स्कॅनिया बस गाडय़ांची खरेदी केली. मात्र या गाडय़ांपैकी काही वातानुकूलित बस गाडय़ांचे वजन दीड टनापेक्षा अधिक असल्याने या बसगाडय़ा अडचणींच्या कचाटय़ात अडकल्या असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ३७ स्कॅनिया कंपनीच्या बसगाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पाच मल्टिएक्सेल तर ३२ सामान्य वातानुकूलित बसगाडय़ांचा समावेश आहे. या पाच मल्टिएक्सेल बसगाडय़ांपैकी तीन बस गाडय़ा येत्या डिसेंबपर्यंत, तर उरलेल्या दोन बस गाडय़ा त्यानंतरच्या महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. परंतु उरलेल्या ३२ बसगाडय़ांचे वजन तब्बल दीड टनाने अधिक असल्याने या गाडय़ा रस्त्यावर धावण्याच्या अगोदरच रखडण्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्याने वर्तवली आहे. या गाडय़ांचे वजन क्षमतेपेक्षा दीड टनाने अधिक असल्याने त्या भिंवडी कारशेडमध्ये उभ्या असल्याचे त्यांनी सांगितले. स्कॅनिया बसगाडय़ांचे वजन बारा टनाऐवजी साडेतेरा टन असल्याने अडचणी येत असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांना विचारले असता, त्यांनी याचे खंडण केले आहे. स्कॅनिया बस गाडय़ांचे वजन नियमाप्रमाणे योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर वजन जास्त असल्यास गाडय़ा चालवणे अशक्य होईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. प्रवाशांच्या आसन व्यवस्थेनुसार कंपनीकडून गाडय़ांचे वजन नक्की केले जाते. सर्वसाधारण अशा प्रकारच्या बसगाडय़ांचे वजन १२ टनापर्यंत असते. मात्र सध्या काही कंपन्यांच्या गाडय़ांचे वजन १५ टनापर्यंत जात आहे. यात सुरक्षेची काळजी घेण्यात येते. मात्र क्षमतेपेक्षा वजन जास्त असल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिकिरीचे होऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.