News Flash

पुण्यात ‘एसटी’चे अतिविशेष रुग्णालय

महामंडळाने अतिदक्षता रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती

st-bus
प्रतिनिधिक छायाचित्र

राज्य शासनाची मंजुरी

प्रवासी सुविधा देणाऱ्या एसटी महामंडळाने आता वैद्यकीय सेवाही देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीतर्फे पुणे येथे पहिले अतिविशेष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालय उभारणीसाठी राज्य शासनाकडूनही मंजुरी मिळाली असून येत्या तीन वर्षांत ते उभारले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

महामंडळाने अतिदक्षता रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत हे रुग्णालय बांधण्यात येणार असून  अद्ययावत वैद्यकीय सेवांबरोबरच १०० पेक्षा जास्त रुग्णांच्या उपचाराचीही व्यवस्था येथे केली जाणार आहे.

परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने अनेक योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात जानेवारी २०१६ मध्ये पार पडला होता. यामध्ये एसटीकडून अतिविशेष रुग्णालय उभारण्याचीही घोषणा करण्यात आली. प्रवासी सेवांशिवाय एसटीकडून अन्य उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी  आवश्यक असते. त्यामुळे रुग्णालय उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. पुण्यातील शंकर शेठ मार्गाजवळच अतिविशेष रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग, पॅथोलॉजी लॅब, एक्स-रे, स्कॅनिंग मशिन, बाहय़ रुग्ण विभाग इत्यादींसह अद्ययावत सेवा असतील. तसेच रुग्णांसाठी १०० खाटाही असणार आहेत. त्यातील २५ टक्के खाटा एसटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रुग्णालय उभारले जाईल. मंजुरी मिळाल्याने रुग्णालय उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचा आराखडा तयार होताच तीन वर्षांच्या आत रुग्णालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जेनेरिक औषध योजनेला प्रतिसाद नाहीच

राज्यातील बस स्थानकांवर स्वस्तात औषधे उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाने जेनेरिक (ब्रँड किंवा पेटेंटशिवाय बनविलेली किंवा वितरित केलेली) औषधे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली. परंतु त्याला प्रतिसादच मिळाला नाही. आता पुन्हा एकदा निविदा काढण्यात येणार आहे. त्याला प्रतिसाद मिळेल, अशी आशा महामंडळाला आहे.

* एसटी स्वखर्चातून रुग्णालय उभारणार होते. मात्र एसटीचे काम हे प्रवासी सुविधा देणे आहे, असा शेरा त्या वेळी शासनाकडून देण्यात आल्याने प्रस्ताव रखडला. अखेर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित’ करा तत्त्वावर रुग्णालय बांधण्याचा निर्णय झाला आणि महामंडळाला पुन्हा नव्याने प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठवावा लागला. अखेर शासनाकडून मंजुरी मिळाली.

* एसटी महामंडळाकडून नवी मुंबईत मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालयही उभारण्यात येणार आहे. मात्र अतिविशेष रुग्णालयातून मिळणाऱ्या उत्पन्नातून महाविद्यालय उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालय उभारण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. एसटीच्या प्रस्तावानुसार, यामध्ये साधारण १०० पेक्षा जास्त जागा असतील. २५ टक्के जागा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 2:34 am

Web Title: msrtc to open specialty hospital in pune
Next Stories
1 अमित राज ठाकरे यांचा सोमवारी साखरपुडा
2 झायरा वसीम छेडछाडप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
3 मुंबईचा वेग मंदावला
Just Now!
X