लाल-पिवळी एसटी, तिच्यावर खच्चून भरलेले आणि दोरखंडाने बांधलेले सामान, अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र आता एसटी बसगाडय़ांवरील हा सामानाचा ‘डोलारा’ कोसळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एआयएस-०५२’ या नव्या मानकानुसार एसटी गाडय़ांवरील कॅरिअर काढून टाकण्यात येणार आहेत. त्याऐवजी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी एसटीच्या पोटात पोकळी तयार करण्यात येणार आहे. मात्र ही जागा सामानासाठी पुरेशी नसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पार्सल सेवेतून महामंडळाला मिळणाऱ्या १२ ते १५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्नालाही जागेअभावी मोठय़ा प्रमाणात कात्री लागणार आहे. या मानकानुसार एसटीच्या बांधणीत १६ बदल सुचविण्यात आले आहेत.
सणासुदीला गावाला जाण्यासाठी राज्यातील मोठा वर्ग आजही राज्य परिवहन महामंडळाला पसंती देतो. या काळात गावी जाणाऱ्या लोकांकडे प्रचंड सामान असते. तसेच सुटी संपवून परतणाऱ्या प्रवाशांकडेही गावातली अनेक ‘जिन्नस’ असतात. हे सामान एसटीच्या टपावर टाकून त्याला मोठ्ठा दोर गुंडाळून प्रवासी निश्चिंत प्रवास करतात. केंद्र सरकारच्या नवीन मानकानुसार कॅरिअरऐवजी प्रवासी आसनांखाली पोकळी निर्माण करून त्यात या सामानासाठी जागा ठेवली जाणार आहे. मात्र यामुळे सामानासाठीची जागा कमी होणार आहे.
एसटी पार्सल सेवाही चालवते. या पार्सल सेवेत मोठमोठय़ा बॉक्सपासून छोटय़ा पाकिटापर्यंत अनेक गोष्टी असतात. त्यातील अनेक गोष्टी एसटीच्या टपावरूनच दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. एसटीला एका महिन्यात या सेवेमधून तब्बल एक ते दीड कोटींचे उत्पन्न मिळते. नवीन बदलानुसार पार्सलसाठीची ४० ते ५० टक्के जागा कमी होईल, असा अंदाज एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. त्यामुळे एसटीला या पार्सल सेवेतून मिळणारे उत्पन्नही सहा ते आठ कोटी रुपयांनी घटेल, अशी शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

काही महत्त्वाचे प्रस्तावित बदल..
* बस बांधणीसाठी अ‍ॅल्युमिनियमऐवजी ‘माइल्ड स्टील’चा वापर.
* चालकासाठी पंख्याची व्यवस्था.
* बसमध्ये पुढे आणि मागे असे दोन आपत्कालीन दरवाजे.
* गाडीत दोन अग्निशामक यंत्रे.
* बसमध्ये पाचऐवजी आठ ठिकाणी एलईडी दिवे.
* खिडक्यांचा आकारही मोठा करणार.
* मनोरंजनासाठी संगीत यंत्रणा.
*  मार्गाचा फलक पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना.