एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनकरार त्वरित लागू न केल्यास संप पुकारण्याचा इशारा सहा कामगार संघटनांनी दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने नव्या वेतनकराराची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नसल्याने या कराराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.एसटी महामंडळात २०१२-१६ या कालावधीसाठी नव्या वेतन करारास राज्य सरकारने मंजुरी दिली. या करारामध्ये कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनाच विशेष लाभ मिळणार असून कामगारांना केवळ १० टक्के वेतनवाढ मिळणार आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोष असून परिणामी अधिकृत कामगार संघटनेने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राइब राज्य परिवहन कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस या विविध संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. सोमवारी या समितीची बैठक होऊन त्यात संपाचा इशारा देण्यात आला.
कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतनश्रेणी लागू करण्यात आल्यामुळे त्यांच्या भत्त्यावर परिणाम होत असून कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत कृती समितीच्या बैठकीत मांडण्यात आले.
संपाचा इशारा देण्यासाठी तसेच वेतनकराराव्यतिरिक्त अन्य मागण्यांसाठी कृती समिती लवकरच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष दीपक कपूर यांना भेटणार आहे.
कृती समितीच्या बैठकीमध्ये डी. आर. पाटील, सुनील गणाचार्य, सुनील निरभवणे, श्रीरंग बरगे, अप्पाराव सताळकर, दादाराव डोंगरे आदी कामगार नेते सहभागी झाले होते.