एक्स्चेंज, तारा जळाल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा खंडित

मुंबई : वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)  इमारतीला लागलेली आग विझवण्यात सोमवारी मध्यरात्री यंत्रणांना यश आले असले, तरी अजूनही अग्निशमन दलाचे ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू असल्याने मंगळवारी येथील सर्व कामकाज बंद होते. या आगीमुळे वांद्रे रेक्लमेशन, कलानगर, खेरवाडी, पाली हिल आणि वांद्रे पूर्व-पश्चिम परिसरात एमटीएनएलद्वारे पुरवली जाणारी दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा खंडित झाली आहे.

इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर असलेले एक्स्चेंज कार्यालय आणि दूरध्वनी तारा जळाल्याने सुमारे २० हजार ग्राहकांचे दूरध्वनी आणि ब्रॉडबँड यंत्रणा बंद पडली आहे. आगीत यंत्रणा जळून खाक झाल्याने ती पूर्ववत होईपर्यंत एमटीएनएल ग्राहकांना असुविधेला सामोरे जावे लागणार आहे.

एमटीएनएलच्या इतर विभागातून काही ग्राहकांची सेवा येत्या २४ तासात सुरू करण्याचे आश्वासन एमटीएनएलकडून देण्यात आले आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे सेवा सुरू करणे शक्य नाही, अशा ठिकाणी पुढील सात ते आठ दिवस ग्राहकांना दूरध्वनी व इंटरनेट सेवेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे एमटीएनएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल एमटीएनएलने दिलगिरी व्यक्त केली आहे.

इमारतीचे ‘कूलिंग ऑपरेशन’ मंगळवारी संध्याकाळपर्यंतही सुरू होते. ते कार्य रात्री उशिरापर्यंत चालेल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आगीमध्ये इमारतीचा दुसरा, पोटमाळा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा मजल्यावरील बहुतांश भाग    भस्मसात झाला आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली. सुरुवातीला यंत्रणांनी जीवितहानी टाळण्यासाठी बचावकार्य राबविले. त्यानंतर इमारतीची आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मात्र तोपर्यंत बहुतांश इमारत आगीच्या कचाटय़ात सापडली होती.

मोठय़ा प्रमाणात असलेली कार्यालयीन कागदपत्रे आणि केबल्सचे जाळे यांमुळे आग पसरली. पोटमाळ्यावरील वाताकूलन यंत्रामुळे लागलेली ही आग विझविण्यात इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली. परिणामी आग पसरून ती सातव्या मजल्यापर्यंत पोहचली. गेल्याच वर्षी इमारतीतील अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला होता, असे एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र ही

यंत्रणा सोमवारी कुचकामी का ठरली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाकडून आगीचा आढावा प्राप्त झाल्यानंतर यंत्रणेतील दोष पुढे येतील, असे अधिकारी सांगत होते.