एअर इंडिया पाठोपाठ आता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही कंपनी सुद्धा आर्थिक दृष्टया अडचणीत सापडली आहे. निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळणार नाही. मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

निधीच्या कमतरतेमुळे बँकांना नोव्हेंबर महिन्याचा पगार काढण्याचे निर्देश सध्यातरी दिलेले नाहीत असे या पत्रकामध्ये म्हटले आहे. एमटीएनएल ही सरकारी कंपनी असून मुंबई आणि दिल्ली या महानगरात कंपनीची ग्राहक संख्या जास्त आहे. १९९२ सालापर्यंत मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात एमटीएनएलची मक्तेदारी होती. दूरसंचार क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्यानंतर एमटीएनल या स्पर्धेत मागे पडण्यास सुरुवात झाली.

एमटीएनएलच्या लँडलाईनपेक्षा मोबाइल स्वस्त असल्यामुळे एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात जिओच्या प्रवेशामुळे मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेक आघाडीच्या खासगी मोबाईल कंपन्यांही स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरु असलेल्या दर युद्धात दूरसंचार कंपन्यांच्या नफ्याचे गणित पार बिघडले आहे. त्यातही सरकारी कंपनी असलेल्या एमटीएनएलला जास्त झळ बसल्याचे सूचित होत आहे.