‘महानगर टेलिफोन निगम’चे मुंबई आणि दिल्लीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. आता सप्टेंबर महिन्याचे वेतन कधी मिळणार याची शाश्वती नाही, अशा गर्तेत हे कर्मचारी सापडले आहे. याबाबत व्यवस्थापनाकडूनही ठोस उत्तर दिले जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

जुलै महिन्याचे वेतन या महिन्यात या कर्मचाऱ्यांना मिळाले. ऑगस्ट महिन्याच्या वेतनाबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. आता सप्टेंबर महिना संपत आला आहे. दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली आहे. वेतनाच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. परंतु स्वेच्छानिवृत्ती योजनेबाबतचा निर्णयही प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. तेव्हापासून सुरू झालेले वेतनाचे दृष्टचक्र अद्यापही संपुष्टात आलेले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी लागणारा निधी हा जोपर्यंत दूरसंचार विभागाकडून मिळत नाही, तोपर्यंत वेतन प्रतीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे व्यवस्थापनाचे मत आहे. याविरोधात एमटीएनएलमधील युनायटेड फोरम या संघटनेने आंदोलनही केले होते. एमटीएनएलमधील अधिकृत असलेले कर्मचारी महासंघाकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.