निशांत सरवणकर

आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचारी असल्याचे कारण पुढे करीत ‘महानगर टेलिफोन निगम’मध्ये (एमटीएनएल) मेगा स्वेच्छानिवृत्ती लागू करणाऱ्या व्यवस्थापनाने आता लाइनमन, सफाई कर्मचारी, चालक आदी दोन हजार तसेच कार्मिक विभागात २३०० अशा सुमारे ४३०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने तातडीने भरती करण्याचे ठरविले आहे. व्यवस्थापनाच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमटीएनएलमधील मुंबई व नवी दिल्ली येथील १४ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे ‘एमटीएनएल’मध्ये मुंबई व दिल्लीत चार हजार २५४ कर्मचारी शिल्लक आहेत. त्यामुळेच तातडीने तब्बल चार हजार ३०० कर्मचाऱ्यांची आता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक आता एमटीएनएलच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. या पत्रकात कंत्राटी भरतीसाठी अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार एमटीएनएल वा बीएसएनएलचे माजी कर्मचारी असलेल्यांसाठी अनुभवाची अटही काढून टाकण्यात आली आहे. परंतु स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून एकीकडे ते कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात नोकरी करणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांमार्फत पुन्हा सेवेत येण्यास प्रतिबंध आहे. असे असताना कंत्राटदारांच्या अटीत मात्र अशा कर्मचाऱ्यांचा उल्लेख करण्यात आल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली आहे.

एमटीएनएलच्या मुंबई व दिल्लीतील कार्मिक विभागात २३०० कर्मचारी आऊटसोर्सिगद्वारे भरण्याबाबत केंद्रीय दूरसंचार विभागानेच मान्यता दिली आहे. स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर कर्मचारी कपात झाल्याने एमटीएनएलची  अनेक कार्यालये रिक्त झाली आहेत. त्यावर उपाय म्हणून व्यवस्थापनाने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी नंतर दूरसंचार विभागाकडून मान्यता घेण्यात येणार आहे.

५० वर्षांपुढील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती जाहीर करताना ती टप्प्याटप्प्याने राबविण्याचे आवाहन सर्वच कामगार संघटनांनी केले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत व्यवस्थापनाने सरसकट स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. आर्थिक चणचण असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र कंत्राटी पद्धतीने पुन्हा कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी व्यवस्थापनाकडे निधी आहे. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन देण्यासाठी व्यवस्थापन तितकेसे इच्छुक नाही, असा आरोप आता केला जात आहे.

कंत्राटी भरती अशी असेल

* चालक – मुंबई – ७५;  दिल्ली – ३५

* लाइनमन – मुंबई – १०००; दिल्ली ३५

* असिस्टंट लाइनमन – मुंबई – ५००; दिल्ली ४२०

* सफाई कर्मचारी आणि रक्षक – दिल्ली – ९६.

* कार्मिक विभाग- दोन हजार ३९६

नाशिकमध्ये कर्मचारी बीएसएनएलच्या सेवेत

नाशिक :  एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी सेवेतून बाहेर गेल्यावर त्याचा विपरीत परिणाम नाशिक येथे कामकाजावर होण्याची शक्यता लक्षात घेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विनामोबदला काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही. नाशिक जिल्ह्य़ातून बीएसएनएलच्या साधारण ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. ९२० पैकी ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.