News Flash

जुहूतील एमटीएनएलची दूरध्वनी सेवा खंडीत

एमटीएनएलच्या खार दूरध्वनी केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या जुहू विभागातील सुमारे एक हजार ग्राहकांचे दूरध्वनी बंद आहेत

जुहूतील एमटीएनएलची दूरध्वनी सेवा खंडीत

पंधरा दिवसांनंतरही दुरुस्ती नाही
शहरातील सरकारी दूरध्वनी सेवा महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल)चे हजारो दूरध्वनी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद आहेत, तर काही दूरध्वनीधारकांची सेवा सुरळीत होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
एमटीएनएलच्या खार दूरध्वनी केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या जुहू विभागातील सुमारे एक हजार ग्राहकांचे दूरध्वनी बंद आहेत, तर दोन हजारांहून अधिक ग्राहकांची दूरध्वनीची सेवा अखंडित मिळत नसल्याची तक्रार आहे. अनेक ठिकाणी दूरध्वनीवरून आवाज समोर पोहचतच नाही, तर अनेकदा समोरील आवाज ऐकू येत नाही असे प्रकार घडत आहेत. इंटरनेट सेवेतही अडचण येत असल्याची तक्रार ग्राहकांची आहे. जुहू विभागांतर्गत जुहू तारा रोड, ब्राह्मणवाडी, दौलतनगर, धीरज शॉपिंग सेंटर, बेस्ट वसाहत, शिक्षक वसाहत, स्मशान गल्ली, रिझवी पार्क, खिरानगर, जुहू, जुहू गार्डन, सांताक्रूझ पोलीस ठाणे परिसर, आरबीआय वसाहत, एलआयसी वसाहत, रहेजा महाविद्यालय, आर्य समाज या परिसरातील सेवेवर परिणाम झाला आहे. या संदर्भात नागरिकांनी दूरध्वनी केंद्रात संपर्क साधल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी विभाग व जनहित कक्षाचे मुंबई चिटणीस देवाशिष मर्क यांनी केंद्रप्रमुखांना निवेदन देऊन ही सेवा तातडीने सुरळीत करावी, असे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी खार केंद्रावरून येणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला असून तो लवकरात लवकर दुरुस्त केला जाईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप ही सेवा सुरळीत झाली नसल्याचे मर्क यांनी स्पष्ट केले. जर आणखी काही दिवस सेवा सुरळीत झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, संबंधित दूरध्वनी केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 4:54 am

Web Title: mtnl phone line dead
टॅग : Dead
Next Stories
1 ‘मार्ड’च्या तीन डॉक्टरांना जबर मारहाण
2 वर्षपूर्तीला मंत्रिमंडळ विस्तार
3 गायकवाडच्या सुटकेसाठी ४० वकिलांची फौज
Just Now!
X