ग्राहकांना मात्र नियमित देयके सुरू

मुंबई : कुर्ला परिसरात ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ (एमटीएनएल) च्या ग्राहकांची दूरध्वनी सेवा तीन-चार महिन्यांपासून खंडित झाली असून वारंवार तक्रार करुनही सेवा पूर्ववत झालेली नाही. असे असतानाही ग्राहकांना नियमित बिल मात्र पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दूरध्वनीऐवजी मोबाइल सेवेकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती सांताक्रुझ परिसरातील रहिवाशांची असून तेथील दूरध्वनीही गेल्या आठ-दहा दिवसांपासून बंद पडले आहेत.

कुर्ला भागातील एलबीएस रस्त्यावर गेल्या दीड वर्षांपूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले होते. यावेळी तेथे तांत्रिक बिघाड झाला होता. याबाबत इम्पेरिअल सायकल मार्टचे शमीम शेख यांनी वारंवार तक्रार करून बिघाड दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ‘अनेक वर्षांपासून ग्राहकांकडे हाच दूरध्वनी क्रमांक आहे. तोच गेल्या दीड वर्षांंपासून बंद असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. वारंवार तक्रारी केल्यावर गेल्या महिन्यात एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या दोन दूरध्वनीपैकी एका दूरध्वनीवरील फोन मोबाइलवर वळते करून दिले. दरम्यान या बंद काळातही नित्यनियमाने बिलाचा भरणा करावाच लागत होता,’ असे शमीम शेख यांनी सांगितले. तर कुर्ला येथील हुतात्मा प्रभाकर किर्लोस्कर मार्गावरील एमटीएनएलच्या लाईनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे वीरेंद्र दीक्षित यांची सेवा खंडित झाली आहे. केबलमध्ये बिघाड झाल्याने फेब्रुवारीपासून सेवा बंद पडली आहे. एमटीएनएलच्या तक्रार क्रमांकावर संपर्क केल्यावर तो क्रमांकही बंद असतो. एमएटीएनएलच्या कार्यालयात जाऊन आतापर्यंत चार वेळा तक्रार केली आहे. त्यावेळी काही दिवसात सेवा सुरू होईल इतकेच सांगितले जाते. तसेच ट्विटरद्वारे तक्रार नोंदविल्यास संबंधित विभागाकडे तक्रार पाठविली आहे, असे सांगितले जाते. मात्र त्यावर पुढे काहीच होत नाही. १९७९ पासून ही सेवा वापरत आहोत. तिच्याशी भावनिक नाते जुळल्याने ती बंद करायची नाही. सध्या दूरध्वनी बंद असला तरी एमटीएनएलकडून नियमित बिल पाठविले जात आहे. तसेच मोबाइलवर संदेश पाठवून बिल भरण्याची सूचना केली जात आहे,’ असे दीक्षित यांनी सांगितले. तर ‘गेल्या चार महिन्यांपासून दूरध्वनी बंद पडला आहे. तरीही बिलाचा नियमित भरणा सुरू आहे. ही सेवा सुरू करण्याबाबत तक्रारी देऊनही त्याचा कोणताच फायदा झाला नाही‘, असे कुर्ला येथील रहिवासी अफरोज मलिक यांनी सांगितले. सांताक्रुझ जुहू कोळीवाडा भागातील विजय नेवाळकर यांची दूरध्वनी सेवाही गेल्या आठ दिवसांपासून बंद झाली आहे. त्यांनी याबाबत एमटीएनएलकडे पाठपुरावा केला आहे. मात्र दूरध्वनी सेवा खंडीत होण्याचे कारण समजू शकले नाही, असे नेवाळकर यांनी सांगितले.

कुर्ला परिसरात पालिकेची कामे सुरू आहेत, त्यामुळे काही ठिकाणी केबलमध्ये बिघाड झाला आहे. त्यातून काही इमारतींमधील सेवा खंडित झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातील काही इमारतींची सेवा पूर्ववत झाली आहे. तसेच ग्राहकांनी तक्रार केली असल्यास सेवा बंद काळातील त्यांचे बिल माफ केले जाते.

दीपक मुखर्जी, एमटीएनएलचे कार्यकारी संचालक