मुंबई विद्यापीठाच्या उदासीन कारभाराचा फटका
विविध कारणांवरून सातत्याने चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अनागोंदी कारभाराची आणखी काही उदाहरणे समोर आली आहेत. परीक्षा देऊन तब्बल दीड वष्रे उलटले तरी निकाल हाती न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण रखडले आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानासाठी कोण जबाबदार असा प्रश्न आता विद्यार्थी विचारू लागले आहेत. मात्र त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्यामुळे हवालदिल विद्यार्थी सातत्याने परीक्षा विभागाचे खेटे घालत आहेत.
सोमय्या विद्याविहार येथील एका विद्यार्थिनीने २०१३-१४मध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षांची परीक्षा दिली. मात्र तिचा निकाल राखून ठेवण्यात आला. अनेक दिवस परीक्षा विभागात खेटे मारल्यानंतर महाविद्यालयाकडून आधीचे गुण मिळाले नाही असे सांगत त्या विद्यार्थिनीचा निकाल राखून ठेवण्यात आला. यानंतर संबधित विद्यार्थिनीने महाविद्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा गुण कळविण्यात आले असे सांगून महाविद्यालयाने परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहिले. हे पत्र देऊन पाच महिने उलटले तरीही आजपर्यंत या विद्यार्थिनीला गुणपत्रिका मिळू शकलेली नाही. तब्बल दीड वष्रे वाट पाहूनही गुणपत्रिका मिळत नसल्यामुळे तिचे उच्च शिक्षण रखडले आहे. असाच प्रकार एमएच्या उपयोजित मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाला आहे. आधीचे सत्र उत्तीर्ण न झाल्याचे कारण देत जवळजवळ संपूर्ण वर्गाचाच निकाल परीक्षा विभागाने राखून ठेवला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विभाग विद्यापीठाचाच असून त्याचे वर्गही विद्यापीठाच्या संकुलातच होतात. आपली चूक सुधारायची सोडून परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना प्रत्येकाने अर्ज करून आधीच्या सर्व गुणपत्रिका जोडा असा द्राविडी प्राणायाम करावयास सांगितला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
विद्यापीठाचा परीक्षा विभागाचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असल्याचे मनविसेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संदर्भात विद्यापीठाचे म्हणणे ऐकण्यासाठी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांना वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.