|| शैलजा तिवले

केईएममध्ये मुंबईतील सर्वाधिक रुग्ण

मुंबई : म्युकरमायकोसिस या बुरशीच्या संसर्गाचा वेग अधिक असल्याने आणि वेळेवर निदान न झाल्याने सुमारे ३० टक्के रुग्णांवर कोणतेही उपचार होऊ शकत नसल्याचे के ईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. अ‍ॅम्पोटेरेसिन बी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे या समस्येत भर पडली आहे.

उपचार न होण्यामागे रुग्ण उशिरा दाखल होणे हेही एक कारण आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ टक्के रुग्ण के ईएममध्ये दाखल आहेत. राज्यात सुमारे सात हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले. त्यापैकी ६०० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या आजाराचा मृत्युदर  आठ टक्क्यांवर गेला आहे.

मुंबईत म्युकरमायकोसिसचे ६३८ रुग्ण असून यातील १३० हून अधिक रुग्ण केईएममधून उपचार घेत आहेत. सध्या केईएममध्ये १०४ रुग्ण दाखल आहेत. ‘केईएममधील बहुतेक रुग्ण अन्य रुग्णालयांमधून पाठविलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांमध्ये म्युकरने आधीच शरीरावर दुष्परिणाम केलेला असतो. त्यात हा रोग पसरण्याची तीव्रता अधिक आहे. या रोगाचे रुग्ण दाखल होतात, परंतु तोपर्यंत अनेकांच्या बाबतीत हा रोग मेंदूपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून किंवा अन्य उपचार करूनही काही फायदा नसतो. असे जवळपास ३० टक्के रुग्ण दाखल आहेत’, असे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

अ‍ॅम्पोटेरेसिन बी या औषधांचे वितरण करणारी समिती के ईएम रुग्णालयात कार्यरत असल्यामुळे रुग्णांना येथे औषधे वेळेवर मिळतील, असे अनेक डॉक्टरांना आणि रुग्णांनाही वाटते. त्यामुळे मुंबईत नव्हे तर महानगर प्रदेशातूनही अनेक रुग्णांना या रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जात असल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

म्युकरच्या रुग्णांमध्ये डोळे, सायनस, मेंदू, नाकाच्या जवळपासचा भाग येथून बुरशी काढण्यासाठी शस्त्रक्रिया तर केलेल्या आहेत. याशिवाय काही रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये पुरवठा सुरळीत आहे का याची तपासणी करण्यासाठी अ‍ॅन्जिओग्राफीदेखील के ली आहे. यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण के लेल्या रुग्णांमध्येही म्युकरची बाधा झालेली आहे. आधीच यांची प्रकृती नाजूक त्यात हा गंभीर आजार झाल्यास प्रकृती  बिघडण्याची शक्यता असते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेवरही मर्यादा

ही बुरशी झपाट्याने तर वाढतेच, परंतु नाक, सायनस, डोळ्यांमध्ये, डोळ्यांच्या मागे, मेंदूमध्ये, गालाच्या हाडाच्या मागून शरीरात कोपऱ्याकोपऱ्यांमध्ये पोहोचते. एका मर्यादेनंतर तेथून तिला काढणे शक्यच होत नाही. शस्त्रक्रिया हा यावरील उपचार नाही. शस्त्रक्रियेने त्या त्या भागातील बुरशी काढून टाकली जाते. करोना झाल्यानंतर रुग्णाची प्रतिकारकशक्ती कमी होते. म्युकरच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने शरीरातील अनेक प्रक्रियांवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे सर्व रुग्णांना भूल देता येत नाही. जवळपास ३० टक्के रुग्णांमध्ये मेंदूपर्यंत ही बुरशी पोहोचली असून ज्यांच्यावर आता कोणतेही उपचार करणे शक्य नाही, परंतु रुग्णांना, नातेवाईकांना हे किती वेळा समजावले तरी त्यांना वाटते की शस्त्रक्रिया केली की बरे होईल, म्हणून मग ते उपचार करा असे विनवणी करत राहतात. अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कसे समजावावे, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे, असे केईएमच्या कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले.

रुग्णालयातून आत्तापर्यंत सुमारे आठ टक्के रुग्ण घरी गेले आहेत. त्यांची औषधे सहा आठवडे सुरू आहेत. यातील काहींमध्ये बुरशी वाढण्याचा संभव नाकारता येत नाही. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सांगणे कठीण आहे, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.

औषधाचा साठा किती?

मुंबईतील २५ टक्के रुग्णसंख्या केईएममध्ये असल्याने उपलब्ध लायपोझल अ‍ॅम्पोटेरेसिन बी इंजेक्शनच्या साठ्यापैकी सुमारे १८ ते २० टक्के साठा केईएममध्ये वापरला जातो, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

वाढ झपाट्याने…

करोनाच्या आधी जे म्युकरचे रुग्ण आम्ही पाहिले होते. त्यांच्यामध्ये ज्या वेगाने ही बुरशी वाढत होती त्याच्या कितीतरी पटीने या करोना रुग्णांमध्ये बुरशी वाढत आहे. त्यामुळे बाधा झाल्यापासून अगदी काही दिवसांतच रुग्णांची प्रकृती गंभीर होते. त्यात इंजेक्शनच्या मात्राही पूर्ण आणि वेळेत मिळत नसल्याने ही बुरशी नियंत्रणात आणणे अवघड होते. त्यामुळे तीव्रता वाढलेल्या रुग्णांमध्ये काहीच करता येत नाही, असे केईएम रुग्णालयाचे औषधशास्त्राचे प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले.