प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या भावी जावयाला करीयरच्या निर्णायक टप्प्यावर एक महत्वपूर्ण सल्ला दिला होता. स्वत: आनंदने एका जाहीर कार्यक्रमात हा किस्सा सांगताना मुकेश अंबानींचे आभार मानले होते. आनंद पिरामलने आपल्या व्यवसायिक होण्याचे श्रेय सासरेबुवांना म्हणजेच मुकेश अंबानींना दिले होते. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना ३३ वर्षीय आनंद म्हणाला कि, मला कन्सल्टिंगमध्ये करिअर करावं की बँकिंगमध्ये? असा प्रश्न पडला होता.

त्यावेळी मी मुकेश अंबानींचा सल्ला घेतला. मुकेश अंबानी मला म्हणाले कि, कन्सल्टंट म्हणजे क्रिकेट सामना पाहण्यासारखे किंवा त्या मॅचचे समालोचन करण्यासारखे आहे. व्यवसाय सुरु करणे म्हणजे प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. समालोचन करताना तू क्रिकेट कसे खेळायचे हे शिकू शकत नाहीस. तुला काही करायचे असेल तर आताच उद्योग-व्यवसाय सुरु कर.

पिरामल उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालक पदावर असणाऱ्या आनंदने पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय इंडियन मर्चंट चेंबरच्या- युथ विंगचा सर्वात तरुण अध्यक्ष म्हणूनही आनंदची वेगळी ओळख आहे. वडील अजय पिरामल यांना व्यवसायात साथ देण्यापूर्वी आनंदने ‘पिरामल ई- स्वास्थ्य’ या स्टार्ट- अपची सुरुवात केली होती तसेच रिअल इस्टेट व्यवसायाचेही काम पाहतो.

मुकेश अंबानी यांची लाडकी मुलगी इशा लवकरच पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. इशा अंबानीचे आनंद पिरामल बरोबर लग्न ठरले आहे. मुला पाठोपाठ मुलीचेही लग्न जुळल्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.