एका महिलेच्या हत्येने पोलिसांपुढे पेच निर्माण केला होता. तिचा दीर, प्रियकर आणि हत्येनंतर गायब झालेला एक तरुण या तिघांवर संशयाची सुई फिरत होती. ..पण अचानक त्या महिलेचा अल्पवयीन मुलगा मारेकरी म्हणून समोर आला; पण अचानक या घटनेला नाटय़मय वळण मिळालं..

ठाणे जिल्ह्य़ातील किन्हवली गावात संध्या निमसे (३५) ही महिला पती गणेश तसेच दीपक आणि राजेश या दोन मुलांसह राहात होती. तिची सासूदेखील सोबत असायची. गणेशचा सुतारकामाचा व्यवसाय होता. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. मोठा दीपक १७ वर्षांचा होता. त्याने नुकतीच बारावी पूर्ण करून आयटीआयला प्रवेश घेतला होता. लहानगा राजेश दहावीला होता. संध्याचा पती गणेशचा भाऊ  हिरामण त्यांच्याच शेजारी राहायचा. गणेशशी लग्न होण्यापूर्वी याच हिरामणने संध्याला लग्नाची मागणी घातली होती. ती संध्याने नाकारली होती आणि हिरामणच्या भावाशी म्हणजेच गणेशशी लग्न केलं होतं. या घटनेला बरीच वर्ष झाली होती; पण हिरामणच्या मनात तेव्हा संध्याने दिलेला नकार सलत होता. ९ ऑगस्टच्या सकाळी संध्या कामानिमित्त बाहेर पडली होती. त्या वेळी घराबाहेरच क्षुल्लक कारणावरून हिरामणचं आणि संध्याचं जोरदार भांडण झालं. हे भांडण जणू निमित्तच होतं.

सकाळी १० वाजता संध्याने घर सोडलं. घरी सासू आणि दोन्ही मुलं टीव्ही बघत होती. दुपारचे बारा वाजले तरी संध्या आली नव्हती. तेव्हा ती कुठे आहे, हे पाहण्यासाठी दीपक गेला असता, घराजवळच्या शेतात त्याला आई मृतावस्थेत दिसली. तो घाबरत घरी आला. तोपर्यंत मृतदेहाभोवती बघ्यांची गर्दी झाली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. डोक्यात दगड घालून संध्याची हत्या करण्यात आली होती.

पोलिसांचा पहिला संशय मयत संध्याचा दीर हिरामण आणि गावातील विजय मौर्या यांच्यावर गेला, कारण घटनेच्या दिवशी हिरामण आणि विजय हे दोघेही एकत्र गावाबाहेर होते. विजय हा गावात तीन महिन्यांपूर्वीच राहायला आला होता. त्या दिवशी मौर्या आणि हिरामणमध्ये ७ ते ८ वेळा संभाषण झालं होतं. हिरामण टोकवडेला गेला. तेथे एका हॉटेलात नेहमीपेक्षा जास्त दारू प्याला आणि दारू पिताना रडत होता, असे बारमालकाने सांगितलं. त्यामुळे ही हत्या हिरामण आणि मौर्याने केली, या निष्कर्षांवर पोलीस आले होते. संध्याचे गावातील आणखी एकासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी त्याच्याकडेही चौकशी केली; परंतु त्याने हत्या केल्याचा कोणताही पुरावा दिसून येत नव्हता.

किन्हवली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तपास करत होते. दरम्यान गावातील मुकेश निमसे या तरुणाने पोलिसांना भेटून धक्कादायक माहिती दिली. संध्याचा मुलगा दीपक यानेच संध्याची हत्या केल्याचं सांगितलं. ज्या दिवशी संध्याची हत्या झाली तेव्हा रक्ताने माखलेल्या शर्टानिशी दीपक आपल्याला दिसला होता व त्याने आपल्याकडे संध्याच्या हत्येची कबुली दिली होती, अशी माहिती मुकेशने पोलिसांना पुरवली. त्याआधारे पोलिसांनी दीपकला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दीपकने खुनाची कबुली दिली. आईचे अनैतिक संबंध होते म्हणून तिची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला उपविभागीय अधीक्षकांसमोर आणले तेव्हाही त्याने आपला गुन्हा कबूल केला.

खुन्याचा शोध लागला होता व गुन्ह्य़ाची उकल झाली होती; परंतु तरीही तपासाचे धागे एकमेकांशी जुळत नव्हते. हीच बाब स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ आणि त्यांच्या पथकातील पोलीस नाईक अशोक पाटील यांना खटकत होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या दोन वाजता दीपकची कोठडीत भेट घेतली, त्याला प्रेमाने जवळ घेतले. पोलीस अधिकाऱ्यांची ती आपुलकी पाहून दीपकचा बांध सुटला आणि तो हमसून हमसून रडू लागला.

‘‘दादा, मी का माझ्या आईला मारेन? ती किती प्रेम करायची माझ्यावर!’’  दीपक उत्तरला.

‘‘मग तू का कबुली दिली?’’ वाघ यांनी विचारलं.

‘‘साहेब, काय करू? जो पोलीस येतो तो मला मारतोय. मी तरी काय करू? मी बर्बाद झालो. माझ्या आईच्याच हत्येप्रकरणी मला पोलिसांनी पकडलंय. मला जगण्यातही स्वारस्य नाही,’’ असं सांगून दीपक पुन्हा रडू लागला.

प्रफुल्ल वाघ यांना खरा प्रकार कळला. काहीही करून खरा गुन्हेगार शोधणं गरजेचं होतं, नाही तर सकाळी दीपकवर गुन्हा दाखल होणार होता. त्यांनी रातोरात किन्हवली गाव गाठलं. दीपकच्या वडील, भावाला उठवलं. हत्या झाली तेव्हा सकाळी ९ ते १२ या कालावधीत दीपक मित्रासोबत टीव्हीवर सिनेमा पाहात होता. या काळात १५ मिनिटांसाठी वीज खंडित झाल्यानंतर तो शेजारी राहणाऱ्या मामाकडे गेला होता. तेव्हाच त्याला मुकेश भेटला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम मुकेशला उचलले. मुकेश हा त्याच गावात राहणारा बेरोजगार तरुण होता. त्याला वाईट व्यसने होती. वाघ यांनी मुकेशची उलटतपासणी सुरू केली आणि काही वेळातच मुकेशने संध्याच्या हत्येची कबुली दिली. मुकेशला पैशाची गरज होती. त्याच्यावर कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने संध्याची हत्या करायचं ठरवलं, कारण संध्या खूप सोन्याचे दागिने घालते हे त्याला माहीत होतं. त्याने सकाळी संध्याला सांगितलं की, तुझ्या शेतात म्हशी गेल्या आहेत. लवकर जाऊन बघ. संध्या धावत शेतात गेली. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या मुकेशने पाठीमागून तिच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर तिच्या गळ्यातले दागिने घेऊन पळून गेला.

वाटेत त्याला संध्याचा मुलगा दीपक दिसला. दीपक हा लहान होता. त्याच्यावरच संध्याच्या हत्येचा आरोप टाकण्याची योजना त्याने केली आणि पोलिसांकडे जाऊन हा बनाव रचला. पोलीसही त्याच्या बनावाला बळी पडले आणि निरपराध दीपकला पोलीस कोठडीत जावं लागलं; परंतु स्थानिक गुन्हे शाखेने योग्य वेळी तपास लावून निरपराध दीपकची सुटका केली आणि खरा आरोपी मुकेशला बेडय़ा ठोकल्या.

सुहास बिऱ्हाडे @suhas_news