लोकसत्ता संपादक शिफारसप्राप्त

जबरदस्त अभिनय, नावीन्यपूर्ण आणि सशक्त संहिता, संहितेबरहुकू म उभारण्यात आलेले आगळेवेगळे नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा सगळ्या बाजूंनी सर्वगुणसंपन्न असलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटय़कृतीवर टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकपसंतीची मोहोर उमटली. आशयात्मक, तांत्रिकदृष्टय़ा दर्जेदार आणि नवे काही करू पाहणाऱ्या सर्जनशील नाटय़कृतींना ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ देण्यात येते. मुक्ता बर्वे निर्मित आणि अभिनीत ‘कोडमंत्र’ ही ‘लोकसत्ता संपादक शिफारस’चा मान मिळवणारी चौथी नाटय़कृती ठरली आहे. ‘२८ बाय १४’च्या सेटवर सीमेवरच्या लष्कराच्या  जगण्याचे नाटय़ रंगवणाऱ्या या भव्य कलाकृतीने प्रयोगशीलतेचा एक नवा मापदंड निर्माण केला आहे.

मुळ गुजराती नाटकावरून बेतलेल्या ‘कोडमंत्र’ची रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण होत असतानाच ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमांतर्गत या नाटकाचा खास प्रयोग सोमवारी शिवाजी मंदिर येथे रंगला. एकाच रंगमंचावर ४० कलाकारांना एकत्र आणून एक भावनिक नाटय़निर्मिती करणाऱ्या ‘कोडमंत्र’चे निर्माते भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर, अजय कासुर्डे आणि स्वत: मुक्ता बर्वे यांच्यासह मुख्य भूमिकेतील अजय पूरकर, गुजराती नाटकाचे मराठीत रूपांतर करणारे लेखक विजय निकम, नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांच्याशी ‘लोकसत्ता’चे फीचर एडिटर रवींद्र पाथरे यांनी संवाद साधला. ‘कर्तव्यकठोरता आणि कर्तव्याचा अतिरेक यातली सीमारेषा धूसर असते..’ या एका अर्थपूर्ण वाक्याभोवती रचलेली सीमेवर लढणाऱ्या जवानांची ही नाटय़कथा पाहताना त्यातला भावार्थ प्रेक्षकांना स्वत:च्या इतिकर्तव्यतेपर्यंत आणून सोडतो. मुळातील हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर आणण्याची इच्छा बाळगणाऱ्या भरत ठक्कर यांनी मुक्ताशी संपर्क साधला. भरत ठक्कर हे स्वत: मराठी नाटकांचे चाहते आहेत, त्यामुळे ‘कोडमंत्र’ मराठीत आणताना निर्मितीचे शिवधनुष्यही त्यांनी खांद्यावर घेतले. त्यांनी दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांना गुजराती नाटक पाहण्याचा आग्रह केला. एक वेगळा प्रयोग असलेले हे नाटक नेहमीच प्रायोगिक नाटकांना व्यावसायिक रंगभूमीवर येण्याची संधी देणाऱ्या निर्माता दिनेश पेडणेकर यांनाही आवडले. निर्माता म्हणून दिनेश पेडणेकर यांची जाण आणि त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव यावर आपल्याला ठाम विश्वास असल्यानेच त्यांच्या सांगण्यावरून या नाटकाची मराठीतील मोट बांधली गेली, असा या नाटय़निर्मितीचा अनुभव मुक्ताने कथन केला.

मूळ गुजराती नाटक स्वाती देसाई यांनी लिहिले आहे. त्या नाटकाची बांधणीच इतकी सुंदर होती की मराठीत रूपांतर करताना आपल्याला फारशी अडचण आली नाही, असे लेखक विजय निकम यांनी सांगितले. मात्र या नाटकाची ताकद त्याच्या शब्दांत नाही तर ते शब्द रंगभूमीवर जिवंत करणाऱ्या कलाकारांमध्ये दडली आहे, अशा शब्दांत निकम यांनी अगदी सैनिकांच्या छोटय़ा भूमिकेत असलेल्या कलाकारांपासून ते अजय पूरकर, मिलिंद अधिकारी, विक्रम गायकवाड, कौस्तुभ दिवाण, अतुल महाजन, उमेश जगताप यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांना या नाटकाच्या यशाचे श्रेय दिले. नाटकाच्या कथेला लष्कराची पाश्र्वभूमी असल्याने भारत-पाक सीमारेषा, सैनिकांचे खंदक, त्यांचे कार्यालय अशी वेगवेगळी लोकेशन्स एकाच सेटवर तेही ४०  कलाकारांना सहजपणे वावरता येईल, अशा पद्धतीने सेट उभारणे हे आपल्यासाठीही खूप मोठे आव्हान होते, असे प्रसाद वालावलकर यांनी सांगितले. तर या नाटकाचा सेट हाही एक कलाकारच असावा इतका या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. नाटकाच्या संहितेनुसार वापरण्यात आलेले संगीत आणि सेटपेक्षाही कलाकारांवरच केंद्रित करण्यात आलेली प्रकाश व्यवस्था हेही या नाटकाचे वैशिष्टय़ ठरले असल्याचे मुक्ताने सांगितले. निर्माती म्हणून नाटकाची निवड करताना त्यातील आशय, दिग्दर्शन या गोष्टींवरच आपला भर असतो. एखाद्या नाटकात भूमिका करायला मिळाली नाही तरी त्याचा विषय चांगला असेल तर आपण निर्मात्याच्या भूमिकेत नक्की असू, असे आश्वासन देतानाच उत्तमोत्तम पटकथा असलेल्या नाटय़कृती प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानसही मुक्ताने या वेळी व्यक्त केला.

Untitled-11