मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांना शिक्षणाची संधी

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शिक्षणातील गळती व नापासांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थी शिकला पाहिजे. याकरिता अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येतात, तरीही अनेक विद्यार्थी काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहताहेत. त्यामुळेच राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. प्रौढ कामगार, गृहिणी, या सर्वाना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण या मंडळाच्या मार्फत मिळू शकणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालणार आहे; परंतु मुक्त विद्यालय मंडळाचा अभ्यासक्रम हा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असेल. त्याची विशेष योजना, व्याप्ती, उद्दिष्टे, मूल्यमापन योजना या सर्व बाबी मुक्त विद्यालय मंडळाशी सुसंगत राहतील. तसेच या मंडळामार्फत कौशल्य संपादित करून स्वत:च्या व्यवसायात उपाययोजना करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक्रम तयार केले जातील, असे सांगून तावडे म्हणाले की, या मंडळांतर्गत मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि संस्कृत आदी विषयांसह अर्थशास्त्र वाणिज्य, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान कौशल्यविकास, बेकरी उत्पादन, स्क्रीन प्रिंटिंग, माहिती तंत्रज्ञान, सहकार आदी विषयांचाही समावेश असेल.

शिक्षण आयुक्त या मंडळाचे अध्यक्ष, तर शिक्षण विभागाचे अन्य संचालक या मंडळावर सदस्य असतील. विद्यपीठाचे प्रतिनिधी तसेच तंत्र व शिक्षण विभागाचे संचालकही या मंडळावर सदस्य असतील. या मंडळातून शिक्षण घेणाऱ्यांना सर्वसाधारण शिक्षणाप्रमाणेच मान्यता असून १० वी किंवा १२ वी पासनंतर त्यांना पुढील शिक्षणही घेता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन झाले तरी एकही रात्रशाळा बंद होणार नाही. जे विद्यार्थी रात्र शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांचे शिक्षण पुढेही सुरू राहील. त्यामुळे रात्रशाळा भविष्यामध्ये बंद होतील अशी भीती कोणी बाळगू नये.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री