शाहीर संभाजी भगत, मुकुंद कुळे, इब्राहिम अफगाण यांच्याकडूनही पुरस्कार परत

साहित्यिकांच्या निषेधाचा सूर आणि पुरस्कार परतीचे सत्र बुधवारीही सुरू राहिले. शाहीर-कवी संभाजी भगत, पत्रकार व लेखक इब्राहिम अफगाण, मुकुंद कुळे यांनीही आपले पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले. अफगाण यांनी ‘साहित्य अकादमी’ आणि उर्दू साहित्य अकादमीकडून मिळालेले दोन पुरस्कार तर कुळे यांनी राज्य शासनाचे मिळालेले दोन पुरस्कार परत केले आहेत. भगत यांना ‘नागरिक’ चित्रपटासाठी ‘सवरेत्कृष्ट गीतकार’ म्हणून मिळालेला पुरस्कार त्यांनी परत केला आहे.

असंवेदनशीलता वाढत चालली असून धर्माधता टोकाला पोहोचली आहे. समाज कलुषित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे साहित्यिक व कलावंतांनी पुरस्कार परत करण्याचे हे अहिंसक पाऊल उचलले आहे. त्याला पाठिंबा व या सगळ्याचा निषेध म्हणून मला मिळालेला पुरस्कार व पन्नास हजार रुपये ही पुरस्काराची रक्कम परत करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे भगत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कुळे यांनी पुरस्कार व १ लाख दोन हजार रुपयांची मिळालेली पुरस्काराची रक्कम परत करण्याचे जाहीर केले आहे.