राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि  संघाच्या धर्मजागरण विभागाचे अखिल भारतीय प्रमुख मुकुंद पणशीकर यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पणशीकर हे बाहेरगावाहून शनिवारी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे उतरले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते. जे हिंदू परधर्मात गेले आहेत त्यांना पुन्हा हिंदूू धर्मात आणण्याचे काम रा. स्व. संघाच्या धर्मजागरण विभागातर्फे केले जाते.

उत्तन, भाईंदर येथील ‘केशवसृष्टी’ प्रकल्पासाठी जमीन विकत घेण्याचा निर्णय पणशीकर यांचा होता. आज ‘केशवसृष्टी’ येथे संघ आणि संघाचे विविध प्रकल्प उभे राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर प्रचारक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पणशीकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.