एप्रिलमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी
विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील साहित्य आणि साहित्यिकांमध्ये संवाद व विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी आता दरवर्षी घुमान येथे दोन दिवसीय बहुभाषासाहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. ज्येष्ठ भाषा अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी पहिले बहुभाषासाहित्य संमेलन घुमान येथे होणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील दिग्गज साहित्यिक, कलावंत आणि रसिक वाचक यांचा या संमेलनात सहभाग असणार आहे.
८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी पंजाब येथील घुमान येथे पार पडले होते. संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या घुमान या गावी झालेल्या संमेलनाला साहित्यप्रेमी आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजनात ‘सरहद्द’ संस्थेचे संजय नहार यांचा महत्वाचा वाटा होता. घुमान साहित्य संमेलनानंतर ‘सरहद्द’तर्फे दरवर्षी घुमानला साहित्याचा उत्सव आयोजित केला जावा, असे नहार यांच्या मनात होते. पहिल्या बहुभाषा साहित्य संमेलनाने त्याची सुरुवात होत असून अरुण नेवासकर हे स्वागताध्यक्ष आहेत.

‘भारत भाषा जोडो’ चळवळ
भारतीय भाषांसाठी मराठीचा पुढाकार’ असा विचार घेऊन या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या माध्यमातून एकप्रकारे ‘भारत भाषा जोडो’ ही चळवळ राबविण्यात येणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक, कलावंत यांनी एकत्र यावे, त्यांच्यात भाषा व साहित्य विषयक विविध विषयांवर चर्चा, संवाद आणि विचारांचे आदानप्रदान व्हावे हा मुख्य उद्देश या मागे असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘सरहद्द’ संस्थेचे मार्गदर्शक राजन खान यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.