रस्त्यांवर वाहने उभी करून वाहने व पादचारी या दोन्हीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी मुंबईला पार्किंग धोरणाची गरज आहे. मात्र रस्त्यांवरील वाहनांसाठी आधी जागा उभी करून द्या, अशी मागणी होत असल्याने रस्त्यावरील पार्किंगच्या शुल्कात वाढ करणारे धोरण दोन वर्षांनंतरही बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे बहुमजली वाहनतळ उपलब्ध करण्याचे पालिकेचे प्रयत्न आठ वर्षांनंतरही फारसे यशस्वी ठरताना दिसत नाहीत. अपेक्षित असलेल्या ६५ वाहनतळांपैकी केवळ ९ वाहनतळ पालिकेच्या ताब्यात आले असून त्यातील केवळ दोन लोकांना उपलब्ध झाले आहेत. या बहुमजली वाहनतळांची स्थिती नेमकी काय आहे, त्याचा हा वृत्तांत.

नेमके धोरण काय?

शहरातील वाहनांची वाढणारी संख्या व वाहनतळांची कमतरता यातील दरी भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने २००६-०७ मध्ये विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या कलम ३३ (२४) वाहनतळ, ३३ (७) सेस व ३३ (९) समूहविकास यांच्या अंतर्गत विकासकांना अतिरिक्त चटई क्षेत्रफळ देण्याच्या मोबदल्यात बहुमजली वाहनतळ बांधण्याचे ठरविले.

वाहनतळांसाठी आलेले प्रतिसाद व पालिकेच्या अटी- शर्थीनंतर त्यातील ६५ ठिकाणी वाहनतळ बांधणे निश्चित केले गेले. यातून पालिकेकडे ४६ हजार ३६६ जागा वाहनांसाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र नऊ वर्षांनंतर पालिकेच्या हाती केवळ ४ हजार २६४ जागा आल्या आहेत.

बहुमजली वाहनतळावर आक्षेप

वाहनतळांचे बांधकाम व पालिकेकडील हस्तांतरण कूर्मगतीने होत असल्याबद्दल सातत्याने टीका केली जाते. या आठवडय़ात पालिकेतील सुधार समितीच्या बैठकीत वाहनतळांचा मुद्दा चर्चेला आला. पालिकेने केलेल्या ६५ प्रस्तावांपैकी केवळ ९ ठिकाणचे वाहनतळ ताब्यात घेतले आहेत. उर्वरित ठिकाणांपैकी अनेक वाहनतळ बांधून पूर्ण झाल्यावरही पालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत. ४६,३६६ वाहनांच्या जागांपैकी केवळ ९ टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. प्रशासकीय उदासीनता आणि इच्छा नसल्यानेच हे घडले असेल किंवा विकासकाने पालिकेला फसवूनही त्याविरोधात पालिकेने कोणतीही कारवाई केली नसेल, असा आरोप अंधेरी येथील नगरसेवक मोहसीन हैदर यांनी केला. गोरेगाव येथील टोपीवाला चित्रपटगृह आणि मरोळ येथील वाहनतळ तयार असूनही पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. तरीही पालिकेकडून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोपही हैदर यांनी केला.

थंडा प्रतिसाद

रस्त्यांवर मोफत जागा उपलब्ध असल्याने वाहने शुल्क भरून वाहनतळांमध्ये लावण्यासाठी लोक तयार नाहीत. लोअर परेल येथील ८४७, अल्टामाऊंट रोडवरील २०४ जागा असलेले वाहनतळ खुले झाले आहेत. मात्र अल्टा माऊंट रोडवरील वाहनतळाला प्रतिसाद मिळालेला नाही. या जागांसाठी मासिक पास, रात्रीच्या वेळेसाठी सवलत अशा सुविधा देऊनही लोकांना ही सेवा महाग वाटते.

सध्या उपलब्ध असलेले वाहनतळ

महानगरपालिकेने बंदिस्त बहुमजली वाहनतळ उपलब्ध करण्याचे ठरवले असले तरी या लोअर परेल व अल्टा माऊंट या दोन वाहनतळांखेरीज मुंबईत सध्या तरी रस्त्यावरील वाहनतळांचीच संख्या जास्त आहे.

शहरात ८५ ठिकाणी असे वाहनतळ आहेत. त्यातील पूर्व उपनगरात ४, तर पश्चिम उपनगरात ७ आहेत. उर्वरित ७४ वाहनतळ फक्त दक्षिण मुंबईत आहेत. त्यातही केवळ ए वॉर्डमध्ये तब्बल ४७ वाहनतळ आहेत.

पूर्व उपनगरात कुर्ला ते मुलुंडदरम्यान केवळ चार वाहनतळ असून त्यातील १२४ जागा चारचाकींसाठी तर ६३ दुचाकींसाठी आहेत. पश्चिम उपनगरात सात वाहनतळांमधून ६३४ जागा चारचाकींसाठी, तर ३५० जागा दुचाकींसाठी आहे

पालिका काय म्हणते?

वाहनतळांमधील जागा घेण्याचे काम सुरू आहे. पालिकेला वाहनतळ हस्तांतरित करत नसलेल्या विकासकांवर कडक कारवाई केली जाईल व त्यांना इतर ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगीही नाकारली जाईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.

उपलब्ध ४२६४ जागांपैकी पश्चिम उपनगरात ३१०, पूर्व उपनगरात २,९०३ तर दक्षिण भागात १०५१ जागा आहेत. वाहनतळ बांधून पालिकेकडे हस्तांतरित केल्यावरच विकासकाला चटईक्षेत्रफळ मिळणार असल्याने त्यात पालिकेची फसवणूक झालेली नाही, असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते. मात्र पालिकेकडून कामे कूर्मगतीने होत असल्याचे अधिकारी मान्य करतात.

वाहनतळ वॉर्ड पातळीवर हस्तांतरित करण्यात येणार होती व त्यानंतर वॉर्डने त्याबाबत निविदा काढून कंत्राट नेमायचे होते. मात्र याबाबत वॉर्ड पातळीवर हालचाली झालेल्या नसल्याने बांधून तयार असलेली वाहनतळेही हस्तांतरित झालेली नाहीत.

untitled-5