प्रतिबंधित इमारतींच्या संख्येतही ‘टी’ विभाग दुसरा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मात्र पालिके च्या ‘टी’ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीतील मुलुंड भागात वेगाने रु ग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुलुंडमधील रुग्णवाढीचा दरही मुंबईच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे.

मुंबईत सध्या दररोज सुमारे १५ हजार चाचण्या के ल्या जात आहेत. मात्र त्यापैकी चार टक्क्यांपेक्षा कमी अहवाल म्हणजेच ३०० ते ४५० रुग्ण बाधित येत आहेत. मात्र संपूर्ण मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दर हा ०.१२ टक्के  इतका खाली असताना मुलुंडमध्ये हाच दर ०.२० टक्के  म्हणजेच सगळ्यात जास्त आहे. तर या भागात प्रतिबंधित इमारतींची संख्येतही हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘अन्य विभागांच्या तुलनेत मुलुंडमधील रुग्णवाढ जास्त असली तरी दर दिवशी प्रत्यक्ष आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘टी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.   सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू झाली तेव्हा मुलुंड आणि घाटकोपरमध्ये सर्वाधिक पासविक्री झाल्याचे आढळून आले होते. याचा अर्थ प्रवास करणारे नागरिक या भागात जास्त आहेत. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे. मात्र तरीही त्या तुलनेत रुग्णांची संख्या नियंत्रित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.