रहिवाशांना दिलासा; कचराभूमीतील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती

न्यायालयाने घेतलेली कडक भूमिका आणि स्थानिक रहिवाशांचा वाढता विरोध यामुळे अखेर पालिकेने येत्या १ ऑक्टोबरपासून मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतला असून कचराभूमीतील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. याकरिता तब्बल ५५८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही कचराभूमी १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार असल्यामुळे मुलुंड आणि आसपासच्या उपनगरांतील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीत टाकण्यात येत आहे. या कचराभूमींमध्ये कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत असून आसपासच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे या भागांतील रहिवाशांकडून कचराभूमींना कडाडून विरोध होऊ लागला आहे. वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पालिका प्रशासनाकडून कचराभूमीबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे न्यायालयाने मुंबईत नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. त्यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले होते. कचराभूमींबाबत नवे प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे आणि ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिल्यानंतर न्यायालयाने तात्पुरती बंदी उठविली आहे.

पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद करण्याचा निर्णय घेतला असून या कचराभूमीतील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. कचऱ्यातील धातू, प्लास्टिक आणि अन्य वस्तू काढून उर्वरित कचऱ्याचे बायोकल्चर पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

१८०० मे.टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती

देवनार कचराभूमीमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पात प्रतिदिन ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा कन्सल्टन्सी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात देवनार कचराभूमीत १८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.