मुलुंडमधील प्रकार; मंदिरे हटवण्यासाठी पालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

मुलुंड येथील नीलमनगर परिसरात मंदिराच्या नावाखाली सरकारी भूखंड हडपण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत ‘समाजकल्याण केंद्रां’ची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात गवाणपाडा अग्निशमन केंद्रासमोरील भूखंडावर दोन मंदिरे उभी राहिली आहेत. चार वर्षांपूर्वी येथे झोपडय़ा उभारण्याचा प्रयत्न झाला होता तो हाणून पाडण्यासाठी मुलुंडकर एकवटले होते त्यानंतर अनधिकृत बांधकामांचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.

नीलमनगर नाल्याजवळ असलेल्या स्वामी समर्थ उद्यानाला लागून मुलुंडच्या जुन्या कपडा विक्रेत्यांच्या सहा-सात लांबलचक पत्र्याच्या शेड आहेत. काही वर्षांपूर्वी या विक्रेत्यांनी पाटील नर्सरीच्या बाजूला असलेल्या या भूखंडावरही ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर कपडा विक्रेत्यांनी नाल्याच्या विरुद्ध बाजूस स्वामी समर्थ उद्यानास लागून असलेल्या चिंचोळ्या जागेत जम बसविला. विक्रेत्यांना हक्काची आणि दिलासा देणारी सरकारी जागा मिळाली. मात्र आता या जागेच्या प्रवेशद्वाराजवळच सहा महिन्यांपूर्वी शंकराचे अनधिकृत मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराबाबत पालिकेच्या टी विभागाकडे तक्रार आल्यानंतर मंदिर हटविण्याबाबत कारवाई करण्याचे पत्र पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. हे मंदिर हटविण्यापूर्वी तथाकथित व्यवस्थापकाला नोटीस बजावण्यात आली. मात्र ही नोटीसच त्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे या मंदिरावर मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही.

मंदिरावरील कारवाई प्रलंबित असताना रोहिदास पाटील प्रतिष्ठानला लागून असलेल्या नाल्यालगतच्या मोकळ्या भूखंडावर दुसरे शंभू महादेवाचे मंदिर अनधिकृतरीत्या बांधले जात आहे. याच वसाहतीत सहा समाजकल्याण केंद्रांच्या वास्तू आहेत. शेवटच्या वारकरी समाजकल्याण केंद्राच्या बाजूला अजून एक तिसरे मंदिर आकाराला येत आहे. समाजकल्याण केंद्रांच्या नावाखाली येथील शासकीय भूखंड यापूर्वीच गिळंकृत झाला असून आता मंदिराच्या नावाखाली शासकीय भूखंड हडपण्याची अहमहमिका सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान या अनधिकृत मंदिरांच्या बाबत अतिक्रमण आणि निष्कासित विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.