मुंबई: मुंबई ते दिल्ली प्रवासही अतिजलद करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबविला जाणार असून या मार्गावरील वेग प्रतितास १३० किलोमीटरवरून १६० किलोमीटपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे दिल्लीपर्यंत राजधानी एक्स्प्रेसचा होणारा १६ तासांचा प्रवासही १२ तासांत शक्य होईल. यावर सध्या काम सुरू असून २०२४ पासून वेग वाढण्यास मदत मिळेल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिली.

देशभरातील विविध रेल्वे प्रकल्प, करोनाकाळात रेल्वेचे काम, इत्यादींविषयी माहिती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित के ली होती. त्यावेळी त्यांनी हायस्पीड रेल्वेची माहिती दिली. मुंबई ते दिल्ली ताशी १६० किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातही १ हजार ३४० कोटी रुपये मिळाले आहेत. रुळांची क्षमता वाढवितानाच, सिग्नल, ओव्हरहेड वायर, पुलांची दुरुस्ती यासाठी संरक्षक भिंत, इत्यादींचीही कामे या मार्गावर करावी लागणार असून ती दोन वर्षांंत होतील, असे शर्मा म्हणाले.

ताशी १६० किमी वेगाने रेल्वे धावणार ; चार तासांनी प्रवास कमी

मुंबई ते दिल्ली मार्गावर सध्या ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालवण्याचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला आहे. हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास चार तासांनी प्रवास कमी होणार आहे. या मार्गावर राजधानी, शताब्दी, दुरान्तोसारख्या गाडय़ा धावतात.

२,६०० कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू

देशभरात रेल्वेच्या २,६०० कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या कु टुंबीयांना रेल्वेने नियमानुसार आर्थिक मदत दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावरही सध्या भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

वंदे भारतच्या ४४ रेल्वे

रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वंदे भारत अंतर्गतही ४४ गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ांची बांधणी व अन्य कामांसाठी निविदा काढण्यात आली असून काम खासगी कं त्राटदारांना सोपविण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान गाडय़ांचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर सप्टेंबर २०२२ पासून गाडय़ा सेवेत येतील. या गाडय़ा कोणत्या मार्गावर धावतील, याचे नियोजन अद्याप बाकी असल्याचेही शर्मा म्हणाले.