मुंबईतील लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या आणखी घटली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या मुंबईत लक्षणे असलेले केवळ ५९०० रुग्ण आहेत. गुरुवारी ११२० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या २,५५,३६२ झाली. गेल्या २४ तासांतच ३३ रुग्णांचा मृत्यू झाला.मुंबईतील करोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर, उपचाराधीन रुग्ण आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्येतही घट होत आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या गुरुवारी जास्त होती. एका दिवशी १८२४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २,२६,०४१ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सध्या १८,३६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ११,९६३ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.  उपचाराधीन रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजेच १६९८ रुग्ण बोरिवलीत आहेत.

मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या ७२५० इमारती प्रतिबंधित आहेत. तर ६०६ झोपडपट्टय़ा प्रतिबंधित क्षेत्र आहेत. एकूण ३७ लाख लोक अद्याप प्रतिबंधित भागात राहत आहेत.

ठाण्यात ९३५ जणांना संसर्ग

ठाणे : जिल्ह्य़ात गुरुवारी ९५३ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील  बाधितांची संख्या २ लाख १० हजार ९६  झाली. दिवसभरात २५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मृतांची संख्या ५ हजार ३०१ इतकी झाली. ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३३६, नवी मुंबईतील १७२, कल्याण-डोंबिवली शहरातील १५९, मीरा-भाईंदर शहरातील ९५, ठाणे ग्रामीणमधील ८७, अंबरनाथ शहरातील ३०, भिवंडी शहरातील २५, बदलापूर शहरातील २५ आणि उल्हासनगर शहरातील २४ रुग्णांचा समावेश आहे. तर, गुरुवारी जिल्ह्य़ात २५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणमधील ८, ठाणे शहरातील ४, नवी मुंबईतील ४, मीरा-भाईंदरमधील ४, अंबरनाथमधील २, तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

देशातील करोनाबाधित ८० लाखांवर

नवी दिल्ली : देशात गुरुवारी आणखी ४९, ८८१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याने बाधितांच्या संख्या  ८० लाख ४० हजार २०३ वर पोहोचली.  करोनातून ७३.१५ लाख जण बरे झाले असून देशातील बरे होणाऱ्यांचे प्रमाणे ९०.९९ टक्के इतके झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. २४ तासात देशात करोनामुळे ५१७ जणांचा मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४९ टक्क्य़ांवर आले आहे.