मुंबईतील २४ वर्षीय तरुणाने एका पंचतारांकित हॉटेलच्या १९ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी तरुणाने फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केला होता. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

विलेपार्लेमधील एन.एम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी. कॉमच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या अर्जून भारद्वाज या तरुणाने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. अर्जूनने सोमवारी पहाटे हॉटेलमध्ये चेक इन केले होते. सकाळी अर्जूनने जेवण मागवले होते. अर्जूनच्या वागण्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशयदेखील आला नाही. ‘अर्जूनचे वागणे संशयास्पद नव्हते. त्यामुळे आत काय सुरु आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती’ अशी माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दिली. अर्जून वांद्रेमधील ताज लँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. संध्याकाळी अर्जूनने फेसबुक लाईव्ह केले. यात अर्जूनने आत्महत्या करत असल्याचे सांगितले. लाईव्ह स्ट्रीमिंग केल्यानंतर अर्जूनने रुममधील खुर्चीच्या मदतीने खिडकीची काच फोडली आणि खाली उडी मारली. यात अर्जूनचा मृत्यू झाला. फेसबुकवरील व्हिडीओत अर्जून मद्यपान आणि ध्रूमपान करताना दिसत होता.

अर्जूनच्या खोलीत नऊ पानी सुसाईड नोटही सापडली आहे. अमली पदार्थांचे व्यसन लागले असून आता जगायची इच्छा नाही असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. नैराश्यातूनच अर्जूनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असे पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या आत्महत्येची दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमांनी अर्जूनचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ प्रसारित करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या व्हिडीओमुळे तरुणांवर मानसिक परिणाम होऊ शकतो असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे तरुणांना आवाहन केले आहे. ‘मुंबईतील तरुणाच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. तरुणांनी काही समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकू असे ट्विटमध्ये म्हटले आहे.