मॉडेल को-ऑर्डिनेटर असल्याचे भासवून जवळजवळ ३० मॉडेल्सना फसविणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणास दिल्लीमध्ये अटक करून मुंबईत आणण्यात आले. लोकेश कुमार नावाच्या या तरुणास बुधवारी दिल्लीत अटक करून पोलिसांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर गुन्हे विभागात आणले. मुंबईतील एका एकोणीस वर्षीय मॉडेलने लोकेश विरोधात सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली होती. गतवर्षी सोशल मीडियावर आपण एक जाहिरात पाहिली होती. ज्यात इव्हेंटसाठी मॉडेल्सना बोलाविण्यात आले होते. जाहिरातीमध्ये दिल्ली, मुंबई, चंदीगड, जयपूरसह अन्य ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी स्त्री आणि पुरुष मॉडेल्सकडून अर्ज मागविण्यात आले होते. एका दिवसाच्या शूटिंगसाठी मॉडेल्सना दहा हजार रुपये, तर नऊ दिवसांच्या शूटिंगसाठी एक लाख ३५ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहिरातीत म्हटले होते, असे या मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोशल मीडियावरील ही जाहिरात पाहून तक्रार नोंदविणाऱ्या मॉडेलने स्वत:चे एक छायाचित्र जाहिरातीमध्ये दिलेल्या इमेलवर पाठवले होते. दुसऱ्याच दिवशी त्याला छायाचित्राची फोटोशूटसाठी निवड करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. त्याचबरोबर करारासाठी दहा हजार रुपये जमा करण्यासाठी सांगण्यात आले. तक्रार केलेल्या या मॉडेलने सदर रक्कमेचा ऑनलाइन भरणादेखील केला. परंतु, अनेक दिवस उलटल्यानंतरदेखील कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने सायबर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी लोकेशच्या मोबाइलचा माग काढला असता, तो दिल्लीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मुंबई पोलिसांची एक तुकडी दिल्लीत दाखल झाली आणि त्यांनी लोकेशला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत लोकेशने आपला गुन्हा स्वीकारून अनेक मॉडेल्सना फसविल्याचे कबूल केले.
सावत्र आईने घराबाहेर काढल्याने आपल्याजवळ एक छदामदेखील नव्हता. त्यामुळे मॉडेल्सना फसविण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात करून, सोशल मीडियावर एक जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती लोकेशने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकेशकडे अधिक चौकशी केली असता, मागील काही महिन्यात लोकेशने (३.५) साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली असून, जवळजवळ ३० मॉडेल्सना फसविल्याचा संशय डीसीपी सी एस राजकुमार यांनी व्यक्त केला.