मोबाईल चार्जिंग सुरु असताना कॉल रिसिव्ह करू नका, असा सावध इशारा अनेकदा दिला जातो. पण त्याकडे तरुण अनेकदा दुर्लक्ष करतात. हाच दुर्लक्षितपणा तुमच्या जीवावरही बेतू शकतो. चार्जिंग सुरू असताना मोबाईलवर आलेला कॉल रिसिव्ह केल्याने शॉक लागून मुंबईतील वांद्र्यात राहणाऱ्या २८ वर्षांच्या तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार वांद्रे येथे काम करणारा तपन गोस्वामी १५ दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. वांद्रे पश्चिमेतील शास्त्रीनगर येथे दोन मित्रांसह तो भाड्याच्या खोलीत राहत होता. तपन हा मूळचा पश्चिम बंगालचा होता. मंगळवारी संध्याकाळी तपनचा मित्र संजय त्याची भेट घेण्यासाठी आला. काही वेळाने संजय घरातून ओरडत बाहेर आला. यानंतर अन्य रहिवाशांनी खोलीत धाव घेतली असता तपन जमिनीवर पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तपनला रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शॉक लागल्याने तपनचा मृत्यू झाला, अशी माहिती भाभा रुग्णालयातील डॉ. प्रदीप जाधव यांनी संबंधित वृत्तपत्राला दिली.

खोलीतील स्विचबोर्डमध्ये पावसाचे पाणी गेले असावे आणि याचदरम्यान तपनने मोबाईल चार्जिंगला लावला असेल. मोबाईल चार्जिंगला असतानाच त्याने कॉल रिसिव्ह केला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हीच बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.