मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून करोनावाढीचा दर सुमारे ०.१३ टक्क्यांवर घसरला आहे. मुंबईत गुरुवारी ३९४ करोनाबाधित रुग्ण सापडले, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे करोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण येऊ लागले आहे. मार्चपासून आतापर्यंत तीन लाख सात हजार ५६३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे पाच पुरुष आणि दोन महिलांचा गुरुवारी करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत ११ हजार ३२६ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५११ रुग्ण गुरुवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले असून आतापर्यंत दोन लाख ८९ हजार ८११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये पाच हजार ५२० करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

पालिकेने बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत २७ लाख ५६ हजार ७३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ५३१ दिवसांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये पालिकेने करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तीन हजार ४१० संशयित रुग्णांचा शोध घेतला असून यापैकी ४१२ रुग्णांना ‘करोना काळजी केंद्र-१’मध्ये ठेवण्यात आले आहे. उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.