24 January 2021

News Flash

योगायोगानं लागला पाच महिन्यापूर्वीच्या खुनाचा छडा

हत्येचा पहिला गुन्हा पचल्यानंतर तशाच पद्धतीने दुसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न फसला आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

हत्येचा पहिला गुन्हा पचल्यानंतर तशाच पद्धतीने दुसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न फसला आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागला. या अटकेमुळे योगायोगाने पाच महिन्यापूर्वीच्या खुनाचा उलगडा झाला. आरोपी योगेश राणेने (३३) जानेवारी महिन्यात सहकाऱ्याची डोक्यात हातोडीचे प्रहार करुन हत्या केली होती. योगेशने नवघर पोलिसांकडे गुन्हयाची कबुली दिली आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली हातोडी जप्त केली आहे.

योगेश राणेने सहकारी विजय यादवची हत्या केली. योगेश आणि विजय दोघेही मुलुंडमधल्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे. योगेश आणि विजय दोघेही एकाच खोलीमध्ये राहायचे. पण त्यांचे आपसात पटत नव्हते. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. अशाच एका भांडणानंतर योगेश राणेने विजय यादवची हत्या करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

जानेवारी महिन्यात एकदिवस योगेश राणे दारु पिण्याच्या बहाण्याने विजय यादवला आपल्यासोबत मुलुंड पूर्वेला निर्जन स्थळी घेऊन गेला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास योगेशने विजयच्या डोक्यात हातोडीचे प्रहार करुन त्याची हत्या केली. कोणालाही विजय यादवची ओळख पटवता येऊ नये यासाठी त्याने त्याचा चेहरा जाळला व तिथून पसार झाला. पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक फेशिअल रिकंस्ट्रक्शन करुन पाहिले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

हत्येनंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आपला गुन्हा पचला असे राणेला वाटले. त्यानंतर हॉटेलमधल्या दुसऱ्या वेटरसोबत भांडण झाले. त्यावेळी योगेश राणे त्या वेटरला त्याच ठिकाणी घेऊन गेला व तशाच पद्धतीने त्याने डोक्यात हातोडीने प्रहार केले. सुदैवाने या हल्ल्यातून तो वेटर बचावला. त्याने पोलीस स्थानकात जाऊन योगेश राणे विरोधात एफआयआर नोंदवला. पाच महिन्यांपूर्वी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे जानेवारीमध्ये घडलेल्या गुन्ह्यामध्ये योगेश राणे सहभागी होता का? त्याचा पोलिसांनी तपास सुरु केला. हॉटेलमध्ये चौकशी केल्यानंतर जानेवारीपासून एक वेटर गायब असल्याचे पोलिसांना समजले. चौकशीमध्ये योगेशने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तो मृतदेह विजय यादवचा असल्याचे स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 10:42 am

Web Title: mumbai 5 months after body found killer arrested dmp 82
Next Stories
1  ‘वर्षां’ बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकीत
2 पार्किंग धोरणाचा पालिकेला विसर
3 वर्ग सुरू होऊनही व्याख्याते बेपत्ता
Just Now!
X