गैरकृत्ये आणि गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री ‘ऑल ऑऊट ऑपरेशन’ ही धडक मोहीम राबवून मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले आणि नाकाबंदी केली.

या कारवाईत अमलीपदार्था संबंधी ५३ गुन्हे नोंदविण्यात आले. तर ४८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. त्याचबरोबर तडीपार कारवाईचे उल्लंघन करून आलेल्या २२ गुन्हेगारांना अटक केली.

‘ऑल ऑऊट ऑपरेशन’ मोहिमेअंतर्गत मुंबईतील पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून एकाच वेळी शुक्रवारी रात्री ११ ते २ दरम्यान तीन तास मोहीम राबविली. शहरातील संवेदनशील भाग, गुन्हेगारी कृत्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांवर जरब बसवली.

कारवाईत ८५१ संशयित  हॉटेल्स, लॉज आणि मुसाफिरखान्यांची  तपासणी केली. शहरात एकाच वेळी ८६१ ठिकाणी नाकाबंदी करून सात हजार ५६२ वाहनांची तपासणी करण्यात आली. तर १८९ ठिकाणी धरपकड, त्याचबरोबर संवेदनशील आणि गुन्हेगारी कारवाया होणाऱ्या भागात पायी गस्त घालण्यात आली. प्

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ अवैध पिस्तुल, ११ तलवारी आणि चाकू जप्त करण्यात आले. त्याचबरोबर अमलीपदार्थांचे सेवन केलेल्या ४४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी गांजा, एमडी आदी अमलीपदार्थ जप्त केले. त्याचबरोबर अभिलेखावरील ३६२ गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच अवैध जुगार आणि दारू अड्डेही उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.