मुंबईतील साकीनाका येथील शाळेत सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. शाळेत खेळत असताना स्वरांग दळवी (वय ६) हा मुलगा खेळताना चक्कर येऊन पडला होता. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट नसून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

साकीनाका येथेल पवार पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत स्वरांग दळवी शिकत होता. गुरुवारी मधली सुट्टी असताना स्वरांग आणि त्याचा मित्र दुसऱ्या मजल्यावर वर्गाबाहेर खेळत होते. यादरम्यान तो चक्कर येऊन पडला. वर्गातील मुलांनी याची माहिती शिक्षकांना दिली. शाळेत प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्याला तातडीने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेले असता डॉ़क्टरांनी त्याला मृत जाहीर केले.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजवरुन विद्यार्थी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे स्पष्ट होते असे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. मुलाला कोणताही आजार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.