मुंबईत करोना रुग्णवाढीचा दर १.१८ टक्कय़ांवर आला आहे.  मंगळवारी नवीन ९९५ रुग्णांची नोंद झाली, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा एक लाखापलिकडे गेला आहे. मृतांची संख्या ५८१४ वर गेली आहे. मृत्यूदर ५.६ टक्के आहे.

मुंबईत दरदिवशी हजार दीड हजार रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी ९९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या एक लाख तीन हजार २६२ झाली आहे. तर दिवसभरात ९०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७३,५५५ म्हणजेच ७१ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले. तर आणखी ८९७ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील ४६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ४४ पुरुष व १८ महिला होत्या. मृतांचा एकूण आकडा ५८१४ वर गेला असून मृत्यूदर ५.६ टक्के  कायम आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर कमी होण्याबरोबर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी ५९ दिवस इतका झाला आहे. आतापर्यंत ४ लाख ४३ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील २३ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १,३२३ रुग्ण

जिल्ह्य़ात मंगळवारी ४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १ हजार ९६९ इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यामध्ये दिवसभरात १ हजार ३२३ नवे करोना रुग्ण आढळून आले असून  एकूण रुग्णसंख्या ७० हजार ५१३ झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू झालेल्यांत कल्याण-डोंबिवलीतील ९, नवी मुंबईतील ७, मीरा-भाईंदरमधील ७, ठाणे ग्रामीणमधील ५, उल्हासनगरमधील ४, भिवंडीमधील ३, अंबरनाथमधील ३ आणि ठाण्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात मंगळवारी १ हजार ३२३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील २६८, नवी मुंबईतील २५४, ठाणे शहरातील १८७, ठाणे ग्रामीणमधील १७७, मीरा-भाईंदरमधील १५०, उल्हासनगरमधील १००, भिवंडीतील ९०, बदलापूरातील ५८ आणि अंबरनाथमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे.