क्षयरोगासाठी उपलब्ध असणाऱ्या औषधांना दाद न देणाऱ्या एमडीआर टीबीच्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या प्रमाणात सुमारे २५ टक्के असल्याचे यावर्षी दिसून आले आहे. पालिका तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या तपासण्यांत हे वास्तव समोर आले असून बहुतांश औषधांना दाद न देणारा अधिक भयावह एक्सडीआर टीबी रुग्णही आढळून आले आहेत.
क्षयरोगावर उपचार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम आखण्यात आला असला, तरी एकटय़ा मुंबई शहरात दरवर्षी क्षयरोगाचे सुमारे ३० ते ३५ हजार रुग्ण आढळतात. त्यात दरवर्षी सुमारे दहा हजार नवीन रुग्णांची भर पडते. क्षयरोग औषधाने बरा होत असला तरी काही वेळा हा आजार अनेक औषधांना दाद देत नाही. अशा ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ रुग्णांचे निदान करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी गोवंडी तसेच धारावी येथे जीन एक्स्पर्ट यंत्रे लावली. धारावी येथे २९९३ रुग्णांना क्षयरोग असल्याचे निदान झाले त्यातील १०६३ म्हणजे सुमारे ३६ टक्के रुग्णांना एमडीआर टीबी होता. महत्त्वाचे म्हणजे यातील ७९५ रुग्णांवर टीबीचे उपचार पूर्वीपासूनच सुरू असले तरी २६८ रुग्णांबाबतीत पहिल्यांदाच निदान झाले. गोवंडी येथेही निदान झालेल्या १६४९ क्षयरोग रुग्णांपैकी ७१६ म्हणजे ४३ टक्के रुग्णांना एमडीआर टीबीची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकारच्या जेजे, हिंदुजा, एसआरएल आणि खासगी रुग्णालयातील तपासण्यांमध्ये मुंबईत १६ नोव्हेंबपर्यंत एमडीआर टीबीचे २९१६ रुग्ण आढळून आले.