देशातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून याचा मोठा फटका राज्यातील पोलिसांनाही बसला आहे. मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे शिपाई सोहेल शेख यांचा रविवारी करोना संसर्गाने मृत्यू झाला. गेल्या महिन्यात त्यांची आई आणि बहिणीचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. एकाच पोलिस कुटुंबातील तिघांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाउनच्या काळात पोलिसांवर बदोबस्ताचा मोठा ताण आला. दिवसरात्र ड्यूटीवर असणाऱ्या अनेक पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सोहेल शेख यांचा ४०दिवसांपूर्वी १२ जून रोजी करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर शेख यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयातील लोकांचीही करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांची ४० वर्षीय बहिण आणि ६३ वर्षाची आई यांच्या चाचणीचा अहवालही पॉझिटीव्ह आला. त्यामुळे या दोघींनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान प्रकृती अधिकच खालावत गेल्याने जून महिन्यात शेख यांची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता शेख यांचाही करोनाविरोधात लढा देताना मृत्यू झाला.