मध्यरात्रीच्या सुमारास विवाहित प्रेयसीच्या फ्लॅटमध्ये खिडकीवाटे घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका १९ वर्षीय युवकाचा नवव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. मुंबईत आग्रीपाडयामध्ये ही दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. रात्री २.३० च्या सुमारास इमारतीच्या वॉचमनने युवकाला रक्ताच्या थारोळयात पडलेले पाहिले.
युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला होता. दोघे एकाच इमारतीत राहत होते. मृत युवक मूळचा बिहारचा असून तो दोनवर्षांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत नायर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका १५ मजली टॉवरमध्ये तो आपल्या काकांकडे राहत होता असे पोलिसांनी सांगितले. अलीकडेच या युवकाला त्याच्या काकांनी २४ वर्षीय महिलेच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. त्यामुळे तो प्रेयसीला भेटण्यासाठी खिडकीवाटे तिच्या घरी जायचा.
काकांनी पकडल्यामुळे युवक महिलेच्या थेट घरी जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने हा मार्ग शोधला होता. तो भिंतीला लागून असणाऱ्या कठडयावाटे खिडकीतून महिलेच्या घरी प्रवेश करायचा. यापूर्वी सुद्धा तो याच मार्गाने गेला होता असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी मध्यरात्री सुद्धा तो याच मार्गाने महिलेला भेटायला गेला होता. खिडकीजवळ पोहोचल्यानंतर आत डोकावून पाहिले तेव्हा महिलेचा पती घरामध्ये होता.
त्यामुळे त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. दोन आठवडे कोसळत असलेल्या पावसामुळे भिंतीची कडा निसरडी झाली होती. माघारी परतत असताना त्याचा तोल गेला व नवव्या मजल्यावरुन तो थेट खाली पडला. मी काहीतरी खाली कोसळल्याचा आवाज ऐकला पण नवरा घरी असल्यामुळे बाहेर काय घडले ते पाहिले नाही असे महिलेने पोलिसांना सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 12:35 pm