भूसंपादन डिसेंबपर्यंत, तर प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत मार्गी लागण्याची अपेक्षा

उमाकांत देशपांडे, मुंबई</strong>

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील भूमिगत स्थानकाचे बांधकाम मार्च २०२० पर्यंत सुरू होणार असून भूसंपादनही डिसेंबर अखेपर्यंत मार्गी लागेल. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनचे महाव्यवस्थापक पंकज उके यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या स्थानकावर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा (आयएफएससी) ९६ मीटर उंचीचा टोलेजंग टॉवर उभा राहू शकेल, हे गृहीत धरुन या भूमिगत स्थानकाचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर दोन तास सात मिनिटांमध्ये पार करु शकणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १३८० हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी ९९९ हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. त्यापैकी २७४.६ हेक्टर जमीन महाराष्ट्रातील असून २९७ पैकी १८३ गावांमधील संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या जमिनीचा प्रश्नही सुटेल आणि प्रकल्पासाठी लागणारी सर्व जमीन वर्षअखेरीपर्यंत ताब्यात येईल, असा दावा उके यांनी केला. प्रकल्पाचे काम आठ विभागांत (सेगमेंट)  करण्यात येत असून काहींची निविदा प्रक्रियाही सुरु झाली आहे. सर्व कामे पुढील वर्षांत सुरू होतील. वांद्रे-कुर्ला संकुलातील भूमिगत स्थानकाची जमीन ताब्यात असून त्यावर वित्तीय सेवा केंद्राची इमारत उभारली जाणार आहे. विमानाच्या फनेलमार्गात हा परिसर येत असल्याने इमारतीच्या उंचीवर निर्बंध असले तरी ९६ मीटर उंचीपर्यंत टॉवर उभारणीसाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकार हवाई वाहतूक महासंचालकांकडे प्रयत्न करीत आहे. हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनकडून त्यादृष्टीने मजबूत पाया उभारणीचे काम केले जाईल. त्यासाठी आयआयटीतील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पार्किंग व्यवस्था भूमिगत असून राज्य सरकारलाही वित्तीय सेवा केंद्रासाठी पार्किंगची जागा हवी असल्याने त्याबाबत चर्चा सुरू आहे. मेट्रो स्थानकही अर्धा कि.मी. अंतरावर असल्याने दोन्ही स्थानके कशाप्रकारे जोडावीत, कोणी किती खर्च करावा, यासंदर्भातही विचारविनिमय सुरु आहे, असे उके यांनी नमूद केले.

चार स्थानके महाराष्ट्रात

बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके असून त्यापैकी चार महाराष्ट्रात असतील. अतिजलद बुलेट ट्रेन बडोदा व सुरत या दोनच स्थानकात थांबेल आणि दोन तास सात मिनिटांमध्ये ताशी ३२० कि.मी.च्या वेगाने हे अंतर कापेल. तर सर्व स्थानकांवर थांबणारी गाडी दोन तास ५० मिनीटांमध्ये हे अंतर कापेल. बुलेट ट्रेन चालकांचे व अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जपान आणि बडोदा येथे सुरू होत असून १६ डब्यांच्या गाडय़ांच्या १०५ फेऱ्या करता येतील, अशा पध्दतीने नियोजन सुरू आहे. काही अंतर भूमिगत (टनेल) सोडले, तर १२ ते १५ मीटर उंचीवरुन ही बुलेट ट्रेन धावेल, असे उके यांनी स्पष्ट केले.