मागच्या ४८ तासात राज्यासह देशाच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे विविध महामार्गांवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कंबरेपर्यंत पाण साचल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतुकसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर इतके पाणी साचले आहे की हा महामार्ग आहे की एखादा ओढा हेच समजत नाहीये. काजूपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या परिस्थितीमुळे महार्गावरील सखल भागातील काही वाहने तरंगताना दिसत आहेत.

मार्गावर अडकलेले लोक चालण्यासाठी डिव्हायडरचा आधार घेत पुढे जात आहेत. आज सकाळपासून ही परिस्थिती असून या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा जोर कमी होऊन पाणी ओसरेपर्यंत वाहतूक पूर्वपदावर येणे शक्य नसल्याचे चिन्ह आहे. या रस्त्यावर जवळपास ४ ते ५ फुट पाणी साचले आहे. याबरोबरच हा महामार्ग जिथून सुरु होतो त्या वसई विरार भागातही पाणीच पाणी झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.