मुंबई : वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस एप्रिल २०२१ पासून बंद केली होती. करोनाची लाट ओसरताच आता तेजस एक्स्प्रेस ७ ऑगस्टपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे.

टाळेबंदीमुळे बंद केलेली तेजस एक्स्प्रेस पूर्ण क्षमतेने १४ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली. मात्र मार्च महिन्यापासून पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आणि मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने करोना नियंत्रणासाठी सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे आयआरसीटीसीनेही २ एप्रिलपासून तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता ७ ऑगस्टपासून गाडी क्रमांक ८२९०२ आणि ८२९०१ तेजस एक्स्प्रेस सुरू होत असल्याचे सांगण्यात आले. ही गाडी शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी धावणार आहे.