वेतनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना बुधवारी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या संपात विमानतळावर हाऊसकिपिंगची सेवा पुरविणाऱ्या क्रिस्टल कंपनीचे १००० कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीवरून काल संध्याकाळपासूनच संप पुकारला होता. त्यामुळे आज सकाळी विमानतळावरील स्वच्छतागृहांची अवस्था बघण्यासारखी झाली होती. स्वच्छतागृहातील अस्वच्छ टॉयलेटस आणि सर्वत्र कचऱ्याने भरून वाहणारे डब्बे असे दृश्य या स्वच्छतागृहांमध्ये पहायला मिळत होते. आम्हाला कामाच्या मोबदल्यापोटी फक्त ५००० रूपयेच मिळतात. त्यामुळे, क्रिस्टल या आमच्या मालक कंपनीला विमानतळ प्रशासनाकडून वेतनाची रक्कम वाढवून मिळावी, अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या काळात आम्हाला कमीत कमी १२,००० रूपये इतके वेतन देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपाला विमानतळावरील शिवसेना आणि मनसेच्या कर्मचारी संघटनांचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आहे. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने सध्या सर्व परिस्थिती आटोक्यात आल्याचे सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांपैकी काहीजणच संपावर गेले आहेत. त्यांच्याऐवजी बदली कामगारांना बोलविण्यात आले असून हे कर्मचारी सध्या विमानतळाच्या सफाईचे काम बघत असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.