मुंबई डोमॅस्टिक विमानतळावरील १-बी टर्मिनलवरील संगणक प्रणालीत रविवारी बिघाड झाल्याने ‘चेक इन’ प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली. याचा परिणाम विमान उड्डाणांच्या सेवेवर झाल्याने काही विमानांचे उड्डाण विलंबाने झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रवाशांमध्येही काही काळ नाराजीचे वातावरण होते. सव्‍‌र्हरवर काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अर्थात काही वेळातच संगणक प्रणातील झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येऊन ‘चेक इन’ प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली. सुमारे पन्नास मिनिटांच्या कालावधीसाठी ही सेवा ठप्प झाल्याने आणि संगणक प्रणाली बंद पडल्याने काही काळ हे काम संगणकाचा वापर न करता करण्यात आल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
यामुळे जेट एअरवेज, स्पाईसजेट, इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आदी विमान कंपन्यांच्या ‘चेक इन’चे नियंत्रण व परिचालन टर्मिनल १-ए वरून करण्यात आले.